

पुणे महापालिकेच्या ७७ रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा मोठा तुटवडा
आरटीआयमधून रुग्णालयांबाबत धक्कादायक माहिती उघड
वर्ग १ च्या १४५ पदांपैकी तब्बल १०३ पदे रिक्त
फिजिशियन, न्यूरोसर्जन, कार्डिओलॉजिस्ट आणि चेस्ट स्पेशालिस्ट या पदांवर डॉक्टर नाहीत
तब्बल १५००० कोटींचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पुणे महापालिकेने यंदा पुणेकरांना सक्षम आरोग्य सुविधा देण्यासाठी शहरात मल्टीस्पेशालिटी रुग्णालये सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या वर्ग १ च्या अधिकारी आणि डॉक्टरांची तब्बल ७४ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. पुणे महापालिकेच्या एकूण ७७ रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा मोठा तुटवडा असल्याचं गंभीर वास्तव समोर आलं आहे. पाहूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
पुणे महापालिकेच्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव दिसून आला आहे. पुणे महापालिकेचे एकूण ७७ रुग्णालय उभी आहेत मात्र या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा रिकाम्या असल्यामुळे याचा थेट परिणाम रुग्णांवर होताना दिसत आहे. महापालिकेच्या शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना अत्यावश्यक सुविधा मिळत नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती सामाजिक कार्यकर्ते गौरव शिंदेंनी माहिती अधिकारातून मिळवली आणि यातून ही धक्कादायक बाब समोर आली. महापालिकेतील वर्ग १ च्या १४५ जागांपैकी १०३ जागा रिक्त आहेत.
पुणे शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या न्यूरोसर्जन कार्डिओलॉजिस्ट आणि चेस्ट स्पेशलिस्ट यासारख्या अति विशेष उपचार तज्ज्ञांची सर्वच्या सर्व पद रिक्त आहेत. इतकच काय तर बालरोग तज्ज्,ञ दंतशल्य चिकित्सक आणि क्ष किरण तज्ज्ञ यांची संख्या सुद्धा कमी आहे. महापालिकेच्या रुग्णालयात साधं एक फिजिशियन नसल्याची माहिती महापालिकेनेच त्यांच्याकडे आलेल्या अर्जाला उत्तर देताना दिली.
विभाग: फिजिशियन
मंजूर पदे: १०
कार्यरत: ०
रिक्त पदे: १०
विभाग: स्त्री रोग तज्ञ
मंजूर पदे: १५
कार्यरत: ७
रिक्त पदे: ८
विभाग: बाल रोग तज्ञ
मंजूर पदे: १३
कार्यरत: ४
रिक्त पदे: ९
विभाग: कान, नाक, घसा तज्ञ
मंजूर पदे: ५
कार्यरत: २
रिक्त पदे: ३
विभाग: क्ष- किरण तज्ञ
मंजूर पदे: १७
कार्यरत: १
रिक्त पदे: १६
विभाग: पेडीअट्रिक सर्जन
मंजूर पदे: ५
कार्यरत: १
रिक्त पदे: ४
विभाग: दंतशल्य चिकित्सक
मंजूर पदे: ६
कार्यरत: ४
रिक्त पदे: २
खासगी रुग्णालयांपेक्षा महापालिकेच्या रुग्णालयांची फी तसेच त्या ठिकाणी होणारा खर्च कमी होईल या हेतूने सामान्य जनता या रुग्णालयांची वाट धरतात मात्र पुणे महापालिकेच्या रुग्णालयात नक्की काय परिस्थिती आहे आणि शहरातील एका महिलेला याबाबत काय अनुभव आला हे ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने, "आम्ही जे रिक्त पद आहेत ते तात्काळ भरली जावी यासाठी सामान्य प्रशासनाकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे.', अशी प्रतिक्रिया दिली. तसेच पुण्याच्या महापौर यांनी याबाबत माहिती घेऊन सांगते अशी एका ओळीची प्रतिक्रिया दिली.
एकीकडे पुणे शहराचा विस्तार होत असताना आणि आरोग्याच्या नवीन आव्हानांना तोंड देताना महत्त्वाची पदे रिक्त असणे ही चिंतेची बाब आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असल्याने नागरिकांना पदरमोड करून खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.