पुण्यातील प्रसिद्ध आणि मानांच्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी गणेशोत्सवामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. या गणेशोत्सव मंडळाचे यंदा १३२ वे वर्षे आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी मंडळाकडून हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
श्रींचे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
गणेश चतुर्थीला म्हणजेच शनिवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर या मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे.
प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून सिंह रथातून श्रीची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ आणि त्यावर सिंहाच्या २ मूर्ती लावण्यात येणार आहेत. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी १२ पासून भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून जटोली मंदिर ओळखले जाते. उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती दगडूशेठ हलवाई गणोशोत्स मंडळाने यावर्षी गणेशोत्सवामध्ये साकारली आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते असे मानले जाते. या गणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येत असून त्यावर रंगकाम करण्यात आले आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाच्या श्रीची विसर्जन मिरवणुकीत यावर्षी ही दुपारी ४ वाजता निघणार आहे. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेला दगडूशेठ गणपती बाप्पा हे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी होतात. पण मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील परंपरेप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी न होता दगडूशेठ गणपती दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
८ सप्टेंबर म्हणजे रविवारी रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरित्या अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते १२ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. उत्सवांतर्गत सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री हे गणेशयाग आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. भाविकांना स्वहस्ते अभिषेक पहाटे ५ ते सायंकाळी ५ यावेळेत मंडपात करता येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.