१५ डिसेंबरपासून कसबा गणपती मंदिर शेंदूर कवच दुरुस्तीमुळे बंद
मूर्तीवरील शेंदूर कवच गळू लागल्याने तातडीची दुरुस्ती आवश्यक
प्रक्रिया तीन आठवडे चालणार, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम
मंदिर इतिहासातील हा पहिलाच शेंदूर कवच दुरुस्तीचा उपक्रम
भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पुण्यातील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरातील मुख्य दैवत श्री गणेश मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेस सोमवार, १५ डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर सर्व भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
ग्रामदैवत श्री कसबा गणपती तमाम गणेशभक्तांचे नवसाला पावणारे आराध्यदैवत आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीं च्या मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत आहे. त्यामुळे भविष्यात कुठलाही दुर्धर प्रसंग उद्भवू नये, म्हणून सध्या असलेले शेंदूर कवच लवकरात लवकर काढणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया करण्यात येणार आहे.
शेंदूर कवच काढण्याकरीता विविध मूर्तीतज्ञ, धार्मिक क्षेत्रातील तज्ञ तसेच पुरातत्व खात्याकडूनही मार्गदर्शन घेण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ही प्रक्रिया विशेषत: श्रींच्या मुख्य रोजच्या पूजेच्या मूर्तीवर करण्यात येणार आहे.
शेंदूर कवच काढणे व त्याअनुषंगाने आवश्यक ती कामे, ही सर्व प्रक्रिया अतिशय संवेदनशील असल्यामुळे साधारण तीन आठवडे लागणे अपेक्षित आहे. कदाचित हा कालावधी कमी होऊ शकतो किंवा वाढूही शकतो. मात्र याचा अंदाज प्रत्यक्ष काम सुरु झाल्यावरच येईल. इथून पुढे होणा-या कामाचा योग्य आढावा घेऊन मंदिर लवकरात लवकर भाविकांसाठी खुले करण्याचा व्यवस्थापन समिती प्रयत्न करणार आहे.
पुण्यातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक असलेले ग्रामदैवत असलेले श्री कसबा गणपती मंदिर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. इसवी सन १६१४ च्या आसपास या मंदिराचे उल्लेख आढळतात. जय मिळवून देणारा असा जयति गजानन असे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचे वर्णन केले आहे. मंदिर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असून, पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्यात या मंदिराचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय विशेषतांनी घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.