पुण्यामध्ये (Pune) वडिलांनीच आपल्या मुलाच्या हत्येसाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पण या हत्येचा प्रयत्न फसला आणि सुदैवाने मुलाचे प्राण वाचले. पुण्याच्या शिवाजीनगर (Shivajinagar Pune) भागामध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून वडिलांनी हे कृत्य केल्याची माहिती तपासातून उघड झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांनीच आपल्या पोटच्या गोळ्याच्या हत्येसाठी सुपारी दिली. मुलाच्या हत्येसाठी वडिलांनी दोन-तीन लाख नाही तर तब्बल 75 लाख रुपयांची सुपारी दिली होती. पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये मुलावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आरोपींचा त्याला मारण्याचा कट फसला. आरोपीने मुलाच्या हत्येसाठी ७५ लाखांची सुपारी दिली होती. यामधील २५ लाख रुपये आधीच देण्यात आले होते. तर उर्वरीत ५० लाख रुपये काम झाल्यानंतर देण्यात येणार होते.
धीरज दिनेशचंद्र आरगडे या बांधकाम व्यवसायिकावर २ जणांनी गोळीबाराचा प्रयत्न केला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. याच सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणाचा तपास करत असताना धीरज यांच्या हत्येची सुपारी वडिलांनीच दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी धीरजचे वडील दिनेशचंद्रसह ६ जणांना पोलिसांनी अटक केली.
१६ एप्रिल रोजी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्सजवळ दुपारी ही घटना घडली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धीरज दिनेशचंद्र अरगडे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली होती.
अरगडे १६ एप्रिल रोजी त्यांच्या कार्यालयात आले होते. काम संपवून ते दुपारी ३ वाजता घरी जाण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडले असता त्यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अरगडे यांच्या गाडीजवळ दुचाकी लावली. दुचाकीवरील दुसऱ्याने पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी पिस्त लॉक झाली आणि त्यामुळे त्यांचा डाव फसला.
धीरज अरगडे यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर लगेच दुचाकीवरून पळून गेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. धीरज अरगडे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांनी केला असता धक्कादायक माहिती समोर आली. वडिलांनीच संपत्तीच्या वादातून मुलाला जीवे मारण्याचा कट रचला असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी दिनेशचंद्र अरगडे यांच्यासह ६ जणांना अटक केली.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, 'कौटुंबिक संपत्ती मुलाला मिळू नये म्हणून वडिलांनी हा सगळा कट रचण्यात आला होता असे प्राथमिक माहिती तपासातून निष्पन्न झाली आहे. दिनेशचंद्र उर्फ बाळासाहेब अरगडे, प्रवीण कुडले, योगेश जाधव, चेतन पोकळे, प्रशांत घाडगे, अशोक ठोंबरे असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. याआधी सुद्धा फिर्यादी यांच्यावर आरोपींनी कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो फसल्यानंतर आरोपींनी पुन्हा एकदा नवीन प्लॅन आखला मात्र तो ही फसला आणि पोलिसांनी या सगळ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.