सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Pune rave party organisers detained : पुण्यातील आळंदी-मरकळ रस्त्यावरील तुळापूर भागात सुरू असलेल्या एका कथित हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास मोठा छापा टाकला. 'प्रोजेक्ट एक्स' (Project X) असं नाव देऊन आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीत अमली पदार्थांचा वापर केल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे पोलिसांनी दोन मुख्य आयोजकांना ताब्यात घेतले आहे.
मध्यरात्री पोलिसांचा गराडा; पहाटे २.३० वाजता ॲक्शन
मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रिसॉर्टवर विनापरवाना दारू, लाऊड साऊंड आणि अंमली पदार्थांच्या नशेत तरुण-तरुणींचा धिंगाणा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या १५ अधिकारी आणि ६५ हवालदारांच्या पथकाने पहाटे २:३० वाजता या रिसॉर्टला वेढा घातला आणि छापा टाकला.
१५६ तरुण-तरुणींची चौकशी, ३ अल्पवयीन
या छाप्यात रिसॉर्टमध्ये १०७ पुरुष आणि ४९ महिला असे एकूण १५६ जण नशेत झिंगलेल्या अवस्थेत पुणे पोलिसांना आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये २१ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ३ जणांचा समावेश आहे. या सर्वांची सध्या पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
८५ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाहा काय काय सापडलं?
या पार्टीत तब्बल ९ लाख २२ हजार रुपये किमतीची विदेशी दारू सापडली. या दारूचा परवाना ६ जूनच्या रात्री ११:३० वाजेपर्यंतच वैध होता, मात्र त्यानंतरही अवैध विक्री सुरू होती. घटनास्थळावरून पोलिसांनी अंदाजे ३ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.१० प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्ससह तीन कप पॉट्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी वाहने आणि इतर साहित्यासह एकूण ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
बड्या इव्हेंट कंपन्यांचे आयोजक ताब्यात
या अनधिकृत पार्टीचे आयोजन करणाऱ्या 'स्टार लाईट एंटरटेनमेंट'चा यश चौधरी आणि 'ब्लेझ एंटरटेनमेंट'चा आयमान शेख या दोन्ही मुख्य आयोजकांना पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे. या पार्टीत अमली पदार्थांची तस्करी कशी झाली? यामध्ये आणखी कोणाकोणाचे कनेक्शन आहे? याचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.