मुंबईतील व्यावसायिकाची १२ कोटी रुपयांची फसवणूक ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मवर झाली.
ईडीने देशभर छापे टाकून ११० कोटी रुपये गोठवले आणि १,२०० क्रेडिट कार्ड जप्त केली.
कंपनीचे संचालन परदेशातून होत असून बनावट बँक खाती व मनी लॉन्डरिंगचे मोठे जाळे उघड झाले.
सरकारने या उद्योगावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला असून सेलिब्रिटींच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऑनलाईन गेमिंगवर सरकारने बंदी घातलेली असताना मुंबईतून धक्कदायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील एका स्थानिक व्यावसायिकाला ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मच्या विळख्यात अडकून १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गमवावी लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे तो मोठ्या कर्जाच्या जाळ्यात अडकला आहे. अजित त्रिपाठी (नाव बदललेले) या व्यावसायिकाने अनेक दशकांच्या परिश्रमातून आपला व्यवसाय उभारला होता. मात्र, कोविड-१९ च्या काळात व्यवसायात तोटा सहन करताना त्यांनी सोशल मीडियावर दाखवण्यात येणाऱ्या ऑनलाईन गेमिंग जाहिरातींवर विश्वास ठेवला आणि त्यातून त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले.
२०२१ मध्ये फेसबुकवर अजित यांना एका लोकप्रिय अभिनेत्रीची जाहिरात दिसली होती. जाहिरातीत मोठ्या परताव्याचे आश्वासन दिले होते. व्यवसायातील तोट्यामुळे त्रिपाठी यांनी जाहिरातीत दिलेल्या लिंकवर क्लिक केले आणि ‘पॅरीमॅच’ नावाचे अॅप डाउनलोड केले. सुरुवातीला त्यांना लहान रक्कमेत परतावा मिळत असल्याचे दिसले आणि त्यातून त्यांचा विश्वास बसला की हा व्यवहार खरा आहे. परंतु काही महिन्यांतच अॅपशी संबंधित लोकांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधला आणि मोठ्या बोनसचे आमिष दाखवून त्यांना जास्त ठेवी करण्यास प्रवृत्त केले.
त्रिपाठी यांनी पुढील तीन वर्षांत सुमारे २७ कोटी रुपये या प्लॅटफॉर्मवर जमा केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यातून फक्त १५ कोटी रुपये परत मिळाले, आणि उर्वरित १२.२२ कोटी रुपये बुडाले. या मोठ्या तोट्यामुळे त्यांनी कर्ज काढले, परंतु त्यातून ते आणखी अडचणीत गेले. त्यांनी सांगितले की, "सुरुवातीला फोन करून ते मला प्रोत्साहित करत होते. पण जेव्हा मी मोठी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माझ्याशी संपर्क तोडला."
या प्रकरणाने दाखवून दिले आहे की ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मची रचना अशी असते की सुरुवातीला ग्राहकाला लहान रक्कम जिंकवून दिली जाते, परंतु पुढे मोठा तोटा करून ग्राहक पूर्णपणे कर्जात बुडतो. यावर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की या प्रकारांमुळे कोट्यवधी भारतीय कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून मध्यमवर्गीयांची बचत नष्ट झाली आहे.
त्रिपाठी यांनी अखेर या फसवणुकीबद्दल मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देशव्यापी तपास सुरू केला. या कारवाईदरम्यान मुंबई, दिल्ली, कानपूर, नोएडा, जयपूर, सुरत, मदुराई आणि हैदराबादसह अनेक शहरांत छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये सुमारे ११० कोटी रुपये गोठवण्यात आले, जे गुन्ह्याच्या उत्पन्नातून आले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
ईडीच्या तपासानुसार, पॅरीमॅच हे नेटवर्क एका युक्रेनियन नागरिकाद्वारे सायप्रसमधून चालवले जाते. कंपनीची नोंदणी कुराकाओमध्ये करण्यात आली असून ते एक कर आश्रयस्थान मानले जाते. तपासकर्त्यांना १,२०० हून अधिक क्रेडिट कार्ड सापडली आहेत ज्यांचा वापर फसव्या ठेवी लॉन्ड्रिंगसाठी केला गेला. फक्त एका आर्थिक वर्षात या प्लॅटफॉर्मने संशयास्पद भारतीय वापरकर्त्यांकडून ३,००० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली असल्याचा संशय आहे.
या चौकशीत बनावट बँक खात्यांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे उघड झाले आहे. तामिळनाडूमध्ये या खात्यांशी जोडलेल्या एटीएममधून रोख पैसे काढले जात असल्याचेही समोर आले. चौकशीत असे प्रश्न उपस्थित करण्यात आले की एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट खाती कशी तयार झाली आणि कर व मनी लाँडरिंगविरोधी यंत्रणा अयशस्वी का ठरल्या. यापूर्वीही पॅरीमॅचवर कारवाई झालेली आहे. २०२३ मध्ये, मुंबई जीएसटी अधिकाऱ्यांनी या कंपनीशी संबंधित एका संचालकाला जीएसटी नोंदणीशिवाय काम केल्याबद्दल अटक केली होती. तसेच या कंपनीचा संबंध नोएडा-स्थित क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ‘आयब्लॉक टेक्नॉलॉजीज’शी असल्याचेही समोर आले होते.
या प्रकरणामुळे पॅरीमॅचचा प्रचार करणाऱ्या सेलिब्रिटींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कंपनीने क्रिकेटपटू दिनेश कार्तिकला त्यांच्या स्पोर्ट्सवेअर लाइनसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमले होते. ही जाहिरात प्रत्यक्षात बेटिंग अॅपसाठीचे सरोगेट प्रमोशन असल्याचे मानले जात होते. याशिवाय अभिनेत्री आणि टीव्ही कलाकारही प्रमोशनल व्हिडिओंमध्ये दिसले होते. सरकारने आता या उद्योगावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील अजित त्रिपाठी यांच्यासारख्या अनेकांनी या फसवणुकीला बळी पडून आपले कष्टाचे पैसे गमावले आहेत. हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, संपूर्ण देशभरातील हजारो लोक या बेटिंग अॅप्समुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारच्या कडक कारवाईनंतर आता या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.