सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई प्रतिनिधी
Navi Mumbai Kishor Londe extortion video : नवी मुंबईतील प्रसिद्ध मनमोहन मिठाईवाला दुकानाच्या मालकाकडून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने तब्बल ३ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचा तुर्भे उपविभाग प्रमुख किशोर लोंढे विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण बाहेर येताच रविवारी नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
मनमोहन मिठाईची नवी मुंबईतील कोपरखैरणे, घणसोली, वाशी आणि सानपाडा येथे दुकाने आहेत. या दुकानाबाहेर असलेले स्टॉल तसेच अतिक्रमण विरोधात किशोर लोंढे नवी मुंबई महानगरपालिकेला वारंवार तक्रार करुन व्यवसायात अडचण निर्माण करत होते. यावेळी तक्रारदाराने यासंबधीची विचारपूस केली असता तक्रार करने थांबविण्यासाठी मनमोहन मिठाईवाला दुकानाच्या मालकाकडून किशोर लोंढे याने ३ लाख रुपये रोख आणि १५ हजार रूपये महिना अशी खंडणी मागितली.
तडजोडीनंतर दोन लाख रूपये रोख आणि १५ हजार रूपये महिना देण्याचे ठरले. यावेळी दुसऱ्या भेटीत किशोर लोंढे याला काही रक्कम देण्यात आली, मात्र उर्वरित रक्कम एकदम देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. अखेर मनमोहन मिठाईच्या मालकाने कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठत किशोर लोंढे विरोधात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीनुसार कोपरखैरणे पोलीसांनी किशोर लोंढे विरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
नवी मुंबईतील खंडणी प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. महत्वाचे म्हणजे खंडणीची काही रक्कम स्वीकारताना ठाकरे गटाचा पदाधिकारी चक्क सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. ठाकरे गटाकडून खंडणी मागणाऱ्या नेत्याविरोधात काय कारवाई करण्यात येतेय, याकडे नवी मुंबईतील नागरिकांचे लक्ष लागलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.