नवी मुंबईत खारघरमध्ये धक्कादायक घटना
१७ वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
पीडिता चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड
आरोपीला अटक करण्यात आली आहे
Navi Mumbai Kharghar Rape Case नवी मुंबईतील खारघर परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १७ वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या अत्याचारामुळे पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले असून, या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असून ती दिव्यांग आहे. ती दिव्यांग असल्याचा फायदा घेत आरोपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला ओळख वाढवत त्याने तिच्याशी मैत्री केली. काही दिवस संवाद साधल्यानंतर आरोपीने मुलीचा विश्वास संपादन केला आणि चार महिन्यांपूर्वी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याने तिच्या पालकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलगी दिव्यांग असल्यामुळे सुरुवातीला तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.
या प्रकरणात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांखाली तसेच अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील 'पोस्को' (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची चौकशी सुरू असून त्याने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.