सचिन गाड
Chhagan Bhujbal News: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला खडेबोल सुनावले आहे. विशेष सत्र न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान ईडीची खरडपट्टी काढली. छगन भुजबळ यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, विशेष सत्र न्यायाधीशांनी ईडीला धारेवर धरलं. (Latest Marathi News)
छगन भुजबळ यांनी त्यांच्या विरोधात दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. छगन भुजबळांनी ईडी विरोधात ही याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान 52 आरोपी कोर्टात हजर होते. ईडीनं युक्तिवादासाठी पुन्हा तारीख मागितली.
ईडीने पुन्हा वेळ मागितल्यानंतर छगन भुजबळ यांचे वकील विजय अग्रवाल यांनी ईडीच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. यानंतर भुजबळ यांच्या वकिलांनी जाणूनबुजून युक्तिवाद आणि टाळाटाळ करण्याकरिता वेळ मागितल्याचा आरोप केला.
छगन भुजबळ यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनीही ईडीला धारेवर धरलं. आजच्या सुनावणीनंतर आता मुंबईच्या विशेष सत्र न्यायलयाने ईडीला १ जुलैपर्यंत अखेरची मुदत दिली आहे.
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळात गंभीर आरोप झाले. त्यावेळी भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोखरक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता.
महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ जून २०१५ रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यानंतर १५ जून २०१५ रोजी ईडीनेही छगन भुजबळ यांच्याविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये २ गुन्हे दाखल केले होते.