मुंबई आणि पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत घटला
मुंबईच्या सात तलावांमध्ये सध्या ८२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पुण्यातील खडकवासला धरणसाखळीत २२.६७ टीएमसी म्हणजेच ७७.८० टक्के पाणी शिल्लक
मुंबई आणि पुण्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही शहरांतील प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. मुंबई महापालिकेने तर अतिरिक्त पाण्यासाठी राज्य सरकारकडे पत्र पाठवून मागणी केली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या एकूण ८२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे. २०२४ मध्ये याच काळात ९१.८० टक्के, तर २०२५ मध्ये ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र तो ८२ टक्क्यांवर आला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे तलावांच्या परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांमधील राखीव पाणीसाठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सध्याच्या कोट्यापेक्षा १० ते २० टक्के जास्त पाणी मिळावे, अशी पालिकेची भूमिका आहे. राज्य सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईला दररोज सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. मे महिन्याच्या अखेरीस पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर झाल्यास राखीव पाण्याचा वापर सुरू केला जाऊ शकतो. गरज पडल्यास पाणीकपात २० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यताही प्रशासनाने लक्षात घेतली आहे.
दुसरीकडे, पुण्यातील खडकवासला धरणसाखळीतही पाणीसाठा कमी झाला आहे. चारही धरणांमध्ये सध्या २२.६७ टीएमसी म्हणजेच ७७.८० टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ९६.८४ टक्के साठा होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.५६ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. धरणांमध्ये सध्या पाण्याची आवक पूर्णपणे थांबली आहे. एकूणच, मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांसमोर पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.