संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई पोलीस दलात कामाचा वाढता ताण, दीर्घ ड्युटीचे तास आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या कामांच्या दबावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड यांचे मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी कर्तव्यावर येत असताना दुर्दैवी निधन झाले. वयाच्या अवघ्या ४८व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी जाधव यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. एकाच महिन्यात दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांच्या कामाच्या स्वरूपाबरोबरच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गायकवाड यांच्या मृत्यूमागे हृदयविकाराचे कारण सांगितले जात असले, तरी कामाचा ताण आणि वरिष्ठांकडून येणारा दबाव यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा कामाच्या ताणाशी थेट संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुशीलकुमार गायकवाड हे नवी मुंबईतील उलवे येथे वास्तव्यास होते. सोमवारी त्यांनी पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर ते आपल्या घरी उलवे येथे गेले होते. दरम्यान, आपल्या मुलीची आठवण आल्याने त्यांनी तिला फोन करून भेटण्यासाठी घरी गेल्याची माहिती समोर आली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आपल्या लाडक्या मुलीसोबतची ही भेट त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरली. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर जाण्यासाठी उलवे येथून मुंबईच्या दिशेने निघाले. प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी सोबत असलेल्या चालक आणि ऑपरेटरला आपली प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. 'मला बरं वाटत नाही, थोडा वेळ गाडीतच आराम करतो. मला उशी द्या,' असे त्यांनी सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर ते गाडीतच झोपले.
गाडी कुरार पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर चालकाने त्यांना आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने चालक आणि ऑपरेटर यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचे शरीर थंड पडल्याचे आणि तोंडातून फेस आल्याचे निदर्शनास आल्याची माहिती आहे. त्यानंतर दोघांनीही त्यांना तातडीने मालाड-पठाणवाडी येथील डीएनए रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे कुरार पोलीस ठाण्यासह संपूर्ण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
सुशीलकुमार गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी जाधव या दोघांनाही अवघ्या सात महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक पदावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती. सेवेत पुढील जबाबदारी स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच दोघांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. गायकवाड यांचे वय अवघे ४८ वर्षे होते. कुटुंबाची जबाबदारी, पोलिसी सेवेतील वाढत्या जबाबदाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षेचे कर्तव्य पार पाडताना पोलिसांना स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येते का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांना केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम करावे लागत नाही, तर त्यांच्या कार्यक्षेत्रातील फेरीवाले, अतिक्रमणे, वाघरी वस्त्या, एसआरए, एमएमआरडीए, वन विभाग आणि इतर प्रशासकीय विषयांशी संबंधित कामांचाही पाठपुरावा करावा लागतो. विविध विभागांशी समन्वय साधणे, वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे, गुन्ह्यांचा तपास, बंदोबस्त आणि नियमित पोलीस ठाण्याचे कामकाज अशा अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळाव्या लागतात.
या सर्व कामांसाठी सातत्याने पाठपुरावा आणि अहवाल सादर करण्याची अपेक्षा असल्याने काही अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या जबाबदाऱ्यांसोबतच प्रशासकीय कामांचा वाढता व्याप आणि वरिष्ठांकडून वेळेत काम पूर्ण करण्यासाठी होणारा आग्रह यामुळे अधिकाऱ्यांवर किती ताण येतो, याचाही आढावा घेण्याची गरज व्यक्त होत आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळेच गायकवाड किंवा जाधव यांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष काढण्यासाठी सध्या पुरेशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कामकाजाच्या पद्धतीचा आणि आरोग्यविषयक सुविधांचा व्यापक आढावा घेण्याची मागणी महत्त्वाची ठरत आहे.
पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास, सण-उत्सव, व्हीआयपी दौरे आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे दीर्घकाळ काम करावे लागते. काही वेळा १६ तासांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ ड्युटी करावी लागत असल्याच्या तक्रारीही ऐकायला मिळतात. कामाच्या अनियमित वेळा, अपुरी विश्रांती, वेळेवर सुट्टी न मिळणे आणि सतत सतर्क राहण्याची गरज यांचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. पोलीस दलात मनुष्यबळाची उपलब्धता, कामाचे नियोजन, साप्ताहिक सुट्ट्या, नियमित आरोग्य तपासणी आणि तणाव व्यवस्थापनासाठी पुरेशा सुविधा आहेत का, याची तपासणी करण्याची गरज या घटनांमुळे अधोरेखित झाली आहे.
एकाच महिन्यात दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलातील कामाचा ताण आणि वरिष्ठांकडून येणाऱ्या सूचनांबाबत नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पोलीस आयुक्त किंवा कोणत्याही विशिष्ट वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दबावामुळे या मृत्यूंच्या घटना घडल्याचा अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे या घटनांकडे केवळ वैयक्तिक आरोग्याच्या समस्या म्हणून न पाहता पोलीस दलातील कामाचे तास, मनुष्यबळ, विश्रांती, सुट्ट्या आणि आरोग्य व्यवस्थेचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे. पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षेची अपेक्षा केली जात असताना, पोलिसांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारीही प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमित आरोग्य तपासणी, हृदयविकारासारख्या आजारांच्या जोखमीचे मूल्यांकन, मानसिक आरोग्यविषयक समुपदेशन आणि पुरेशी विश्रांती मिळणे महत्त्वाचे आहे. कामाच्या स्वरूपानुसार ड्युटीचे तास निश्चित करणे, साप्ताहिक सुट्ट्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि अतिरिक्त कामाचा भार योग्य पद्धतीने विभागणे यावरही भर देण्याची गरज आहे. सुशीलकुमार गायकवाड आणि शिवाजी जाधव यांच्या मृत्यूंमुळे पोलीस दलातील कामाच्या परिस्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनांमागील वैद्यकीय कारणे आणि परिस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असले, तरी पोलिसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, हा संदेश या दुर्दैवी घटनांनी अधोरेखित केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलिसांना स्वतःच्या आरोग्यासाठी पुरेसा वेळ, विश्रांती आणि आवश्यक वैद्यकीय मदत मिळणार का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.