
बांगुरनगर परिसरात दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये नवजात बालिका सापडली आहे.
पोलिसांनी तिला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
बालिकेच्या अंगाला मुंग्या लागल्या होत्या.
संजय गडदे, साम प्रतिनिधी
मानवी संवेदना आणि सामाजिक मूल्यांना हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. माईंडस्पेस बॅक रोडवरील अथेना बिल्डिंगजवळ एका अज्ञात स्त्री-पुरुषाने नवजात मुलीला उघड्यावर टाकून दिले, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. बीट मार्शल तीन हे नियमित गस्त घालत असताना दोन ट्रॅव्हल्सच्या मध्ये रडण्याचा आवाज ऐकून त्यांनी पाहिले असता एक नवजात बालिका मुंग्या लागलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. पोलिसांनी तत्काळ मानवी धर्म निभावत बालिकेला उचलून शताब्दी रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने उपचार केले.
सुदैवाने बालिकेची प्रकृती स्थिर असून, उपचारानंतर तिला २० ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर बांगुरनगर पोलिसांनी निर्भया पथकाच्या आणि मोबाईल ५ च्या मदतीने तिला सेंट केथ्रिन होम, अंधेरी (पश्चिम) या बालसंगोपन संस्थेत सुरक्षित दाखल केले.
या प्रकरणी बांगुरनगर पोलिस ठाण्यात अज्ञात स्त्री-पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल (गु. र. क्र. ५५२/२५ कलम ९३ बीएनएस २०२३) करण्यात आला आहे. सध्या पोलिस या अमानुष कृत्यामागील व्यक्तींचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे एक मोठा आणि वेदनादायी प्रश्न पुन्हा समोर आला आहे — “मुलगी जन्माला आली म्हणून तिला शिक्षा का? सामाजिक मूल्ये, शिक्षण आणि प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या समाजात अजूनही स्त्रीजन्माला शाप समजून तिला टाकून देणे, हे केवळ गुन्हाच नव्हे तर मानवतेवरील पाप आहे.
आजही काही कुटुंबांत मुलगी जन्माला आली की ती भार असल्याची समजूत खोलवर रुजलेली आहे. पण ही बालिका, जी अजून आयुष्याचा श्वास ओळखण्याआधीच टाकून दिली गेली, तिच्या स्वरात एक प्रश्न दडलेला आहे — “मी मुलगी आहे म्हणून मला आयुष्याचा हक्क नाही का?” मानवी नात्यांच्या मूल्यांची ही अधोगती आपल्याला अंतर्मुख करते. ज्या समाजात मुलींच्या रूपात शक्ती, सृजन आणि करुणा मानली जाते, त्याच समाजात अशी अमानुष कृती होणे हे आपल्या सामूहिक सामाजिक भानावर प्रश्नचिन्ह उभे करते.
मुंबई पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि मानवी संवेदना ही प्रशंसनीय असली, तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संपूर्ण समाजाने आपली मानसिकता बदलण्याची आणि जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. कारण — ही घटना केवळ एका बालिकेवर अन्याय नाही, तर आपल्या समाजाच्या अंतरात्म्यावरचा डाग आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.