संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
MTNL cable theft case Mumbai latest news : कांदिवली पूर्वेतील अशोक नगर परिसरात झालेल्या एमटीएनएलच्या भूमिगत केबल चोरी प्रकरणाचा तपास करताना समतानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल १३ आरोपींना बेड्या ठोकल्या असून, सुमारे २०.८० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत या टोळीचा मुख्य सूत्रधार म्हणून आदित्य घुगे याचे नाव समोर आले असून, तो भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर-पश्चिम मुंबई जिल्ह्याचा उपाध्यक्ष असल्याचा दावा केला जात आहे.
२२ जून रोजी अशोक नगर क्रॉस रोड क्रमांक ४, कांदिवली पूर्व येथे भूमिगत एमटीएनएल कंपनीच्या २००० पेअरच्या चार केबल चोरीला गेल्या होत्या. या केबलची लांबी सुमारे १५३ मीटर असून, त्यांची किंमत ९ लाख ५०० रुपये इतकी होती. या प्रकरणी एमटीएनएलचे व्यवस्थापक विरेंद्र ललताप्रसाद यादव (५२) यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात बीएनएसच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या टोळीचा सुगावा लावला. तपासादरम्यान पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली. त्यांच्या कसून केलेल्या चौकशीत या संपूर्ण केबल चोरीच्या मागे आदित्य घुगे हाच मुख्य मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात सुबोध मोरे आणि अयुब खान हे आदित्य घुगेचे मुख्य साथीदार असल्याचेही तपासात उघड झाले आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन दीड महिन्याहून अधिक काळ उलटला तरी आदित्य घुगे, सुबोध मोरे आणि अयुब खान हे तिघेही फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी समतानगर पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेला आदित्य घुगे हा भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी असल्याने या प्रकरणाला आता राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा या गुन्ह्यातील सहभाग न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध व्हायचा असून, पोलीस तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत.
अटक केलेल्या आरोपींकडून चोरीची कार्यपद्धती (Modus Operandi) आणि इतर गुन्ह्यांची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण २०.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीचा मुंबईतील इतर केबल चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का, याचाही तपास समतानगर पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.