मध्य रेल्वेवर रविवारी रेल्वे मार्गांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार
ठाणे ते कल्याणदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक
मुख्य मार्गावरील काही लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार असून गाड्या सुमारे १० मिनिटे उशिराने धावतील
पनवेल-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द राहणार
हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे मार्गांची दुरुस्ती आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा परिणाम मुख्य मार्ग, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर होणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याणदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात धीम्या मार्गावरील लोकल गाड्या जलद मार्गावरून चालवण्यात येतील. तसेच मुलुंड ते कल्याणदरम्यान काही लोकल गाड्यांच्या मार्गात बदल केला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल सुमारे १० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.
पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या सकाळी ११.०२ ते दुपारी ३.४३ या वेळेतील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेतील लोकलही धावणार नाहीत.
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीहून बेलापूर व पनवेलकडे जाणाऱ्या काही लोकल फेऱ्या रद्द राहतील. दरम्यान, ब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तसेच ठाणे-वाशी आणि ठाणे-नेरुळदरम्यान लोकल उपलब्ध असतील. पोर्ट मार्गावरील लोकल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवासाचे नियोजन करताना प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत सूचना आणि वेळापत्रकाची माहिती घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.