

मुंबईत धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार
दोन गटात तुफान हाणामारी झाली
धारदार शस्त्राने वार करण्यात आले
हल्ल्यात तिघे जण जखमी झाले
मध्य रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये सीटच्या वादातून रक्तरंजित थरार झाला. अंबरनाथ लोकलमध्ये धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला करण्यात आला. या घटनेत दोघांची प्रकृती गंभीर आहे. तिघांवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री १२.१० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.
मध्य रेल्वेच्या अंबरनाथ लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या किरकोळ वादाने हिंसक रूप धारण केले. दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. धावत्या लोकलमध्ये झालेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १० वाजून ४९ मिनिटांनी परळ येथून सुटलेल्या अंबरनाथ लोकलच्या लगेज डब्यात हा प्रकार घडला. डोंबिवली स्थानकानंतर ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान सीटवर बसण्याच्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी लोखंडी कड्याने हल्ला करण्यात आला. या डब्यामध्ये सगळीकडे रक्ताचे सडे पडले होते.
या मारहाणीत राजू वाघे (१९ वर्षे), साहिल खंदारे (१९ वर्षे) आणि प्रितेश कनोजिया (३१ वर्षे) हे तीन तरुण जखमी झाले आहेत. तिघांनाही कल्याण स्थानकावर उतरवून प्रथम रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेतील आरोपींनी ठाकुर्ली स्थानकावर उतरून पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.