

मुंबईत निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं
मुंबईतील जोगेश्वरीत बॅनर कारवाईवरून संताप
पालिकेचे अधिकारी कारवाईत दूजाभाव का करतात? शिवसेना ठाकरे गटाच्या पालिका अधिकाऱ्यांना सवाल
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबईच्या जोगेश्वरीतील मेघवाडी सर्वोदय नगर परिसरात मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागाने अनधिकृत बॅनर हटवण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान एका गटाचा बॅनर न हटवल्याने मोठा वाद निर्माण झाला. शिंदे गटाचा बॅनर तसाच ठेवून इतर बॅनर हटवले जात असल्याने कारवाईत उघड पक्षपात होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या बॅनरवर कारवाई होत नसल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून पालिका गाडीचा समोर ठिय्या देत आंदोलन करण्यात आले.
मुंबई पालिका क्षेत्रात विनापरवानगी बॅनर लावणे कायद्याने गुन्हा असताना सर्रासपणे जोगेश्वरी पूर्वेकडील सर्वोदय नगर परिसरात सर्व पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली होती. आज दुपारी पालिकेचे पथक कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी सत्ताधारी शिंदे गटाचे बॅनर न काढता इतर सर्व राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे बॅनर पालिकेकडून काढण्यात आले. मात्र या कारवाईत ठाकरे गटाकडून पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप करण्यात आला.
पक्षपातीपणाचा आरोप करत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. ठाकरे गटाचे शाखाप्रमुख नंदू ताम्हणकर थेट रस्त्यावर उतरले. एका गटासाठी एक नियम आणि दुसऱ्यासाठी दुसरा? पालिका अधिकारी कारवाईत दूजाभाव का करतात? असा सवाल ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केला.
ताम्हणकर आणि कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झालीये. दोन्ही गट आमनेसामने येत वातावरण तापलं. वाढता तणाव लक्षात घेऊन कार्यकर्ते मेघवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पालिकेने अखेर संबंधित वादग्रस्त बॅनर हटवला.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी देखील कारवाईतील भेदभावाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीच्या तोंडावर काही बॅनर काढले जातात तर काहींना हातही लावला जात नाही, हा पद्धतशीर राजकीय दबावाचा परिणाम आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.