अमित गवळे, प्रतिनिधि
रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील सुकेळी खिंडीत शुक्रवारी (ता. 3) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास एका खासगी स्लीपर कोच बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ३५ ते ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ८ ते ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बचाव पथकातील सदस्य सागर दहिंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर खासगी बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. सुकेळी खिंडीतील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली व हा अपघात झाला. चालकाचा ओव्हर स्पीड आणि रस्त्याचे धोकादायक वळण हे या अपघाताचे मुख्य कारण असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, कोलाड आणि नागोठणे पोलीस ठाण्यातील कर्मचारी, एरुणकर टोइंग सर्विस आणि रुग्णवाहिका यंत्रणांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सागर दहिंबेकर यांनी सांगितले की गेल्या काही वर्षांत सुकेळी खिंडीत गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर अनेक अपघात झाले होते. प्रशासनाने तिथे योग्य नियोजन केल्याने वर्षभरात अपघात थांबले होते. मात्र, आता मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गीकेवर हा मोठा अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.