

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Bandra East elderly woman murder case details : मुंबईतील वांद्रे (पूर्व) परिसरात फुटपाथवर मृतावस्थेत आढळलेल्या अनोळखी वृद्ध महिलेच्या हत्येचा गंभीर गुन्हा खेरवाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला आहे. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहितीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपी भानुदास विठ्ठल कांबळे (वय ४४) याला ठाणे येथून अटक केली आहे.
२७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास आरएनए (RNA) बिल्डिंग शेजारील फुटपाथवर, वांद्रे (पूर्व) येथे एक अनोळखी महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. तिला तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला दाखलपूर्व मृत घोषित केले. या प्रकरणी सुरुवातीला खेरवाडी पोलीस ठाण्यात अपमृत्यू नोंद क्र. २३/२०२६, कलम १९४ बीएनएसएस (BNSS) अंतर्गत नोंद करण्यात आली होती.
सायन शवविच्छेदन केंद्रात करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टेम अहवालात महिलेचा मृत्यू हा “गळा दाबल्याने आणि डोक्यावर बोथट वस्तूने मारहाण केल्याने” झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी २९ एप्रिल रोजी अज्ञात आरोपीविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात कलम १०३ भा.न्या.सं. अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सरकारी व खासगी सीसीटीव्ही फुटेज तपासले. रात्रीभरातील फुटेज तपासत असताना एका संशयित व्यक्तीचे अस्पष्ट चित्रण मिळाले. तपासादरम्यान हा संशयित इसम रात्री २.५५ वाजता एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा तोडताना दिसला. त्यानंतर तो बीकेसी रोडकडे जात असल्याचेही समोर आले.
घटना घडलेल्या रात्री गस्तीवर असलेल्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस हवालदार गणेश ठोंबरे, श्याम ठाकरे आणि पोलीस शिपाई समीर कांबळे यांनी बीकेसी रोडवरील मुंबई बँक परिसरात याच वर्णनाचा एक इसम रात्री ३.३० वाजता संशयास्पद हालचाली करताना हटकला होता. त्यावेळी त्याने महाराष्ट्र नगर परिसरात राहत असल्याचे सांगितले होते. तपासादरम्यान सीसीटीव्हीतील व्यक्ती आणि गस्तीवेळी हटकलेला इसम एकच असल्याचे निष्पन्न झाले. गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. त्याचे नाव भानुदास विठ्ठल कांबळे असल्याचे समोर आले. तो ठाणे (पश्चिम) येथील वर्तकनगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी २६ एप्रिलच्या रात्री हळदीच्या कार्यक्रमासाठी वांद्रे (पूर्व) येथे आला होता. घरी परतत असताना तो आरएनए बिल्डिंगजवळ फुटपाथवर लघुशंका करत होता. त्यावेळी फुटपाथवर बसलेल्या वृद्ध महिलेने त्याला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने आरोपीने जवळील वीट उचलून महिलेच्या डोक्यावर मारली. तरीही महिला शिवीगाळ करत राहिल्याने आरोपीने संतापाच्या भरात दोन्ही हातांनी तिचा गळा दाबून खून केला आणि घटनास्थळावरून पसार झाला.
तपासादरम्यान मृत महिलेची ओळख सौभाग्यअम्मा हनमंता कर्थीम्यनुर (वय ७८) अशी पटली. त्या धारावीतील शाहूनगर परिसरात राहत होत्या. त्या हरवल्याची तक्रार २३ एप्रिल रोजी शाहूनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया, दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील, प्रभारी पोलीस निरीक्षक सविता माळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुणाल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.