मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावर प्रदूषण नियमांचे उल्लंघन
पालिकेने प्रकल्पाला काम बंद करण्याची नोटीस बजावली
बीकेसी व वांद्रे भागातील कामात वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन
आवश्यक सुधारणा होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम थांबवले
मुंबई ते अहमदाबाद अंतर दोन ते अडीच तासांत पार करता यावे यासाठी महत्त्वाकांक्षी असा मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने प्रदूषणाच्या नियमांचे पालन न केल्याने आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्याने पालिकेच्या एच पूर्व विभागाकडून प्रकल्पाला काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकल्पात आवश्यक त्या सुधारणा व उपयोजनांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम बंद राहणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला मोठा फटका बसणार आहे.
एकीकडे राज्यातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असून दुसरीकडे मुंबईच्या हवामानातील गुणवत्ता ढासळली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळल्याप्रकरणी न्यायालयाकडूनही पालिकेवर सातत्याने ताशेरे ओढण्यात आले.
बुधवारी पालिकेने केलेल्या तपासणीत बुलेट ट्रेनच्या बीकेसीतील स्थानकाच्या कामादरम्यान तसेच वांद्रे येथील उच्च न्यायालय संकुलासाठीच्या पाडकामादरम्यान प्रदुषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत पुन्हा आढळले. बुलेट ट्रेन स्थानकाच्या कामादरम्यान एनएचएसआरसीएलकडून वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन होत असल्याची बाब पालिकेच्या तपासणीत निदर्शनास आली.
त्यानंतर पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजवावी होती. मात्र या नोटिशीनंतरही प्रकल्पात वायू प्रदूषण नियंत्रणांच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा न झाल्याने बीकेसीतील वायू प्रदूषणास, हवेची गुणवत्ता ढासळण्यास हा प्रकल्प जबाबदार ठरत असल्याचे समोर आले. उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करत पालिकेवर ताशेरे ओढत आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान या नोटीस नंतर बीकेसी मधील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम पालिकेने थांबवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.