सुशांत सावंत, मुंबई
Andheri East Bypoll Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने '१६६ - अंधेरी पूर्व विधानसभा' मतदार संघाची पोटनिवडणूक (Election) जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र, आता मनसेनेही यात उडी घेतली आहे. अंधेरी पोट निवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मिळू शकतो. याबाबत चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली आहे. (Mumbai Politics News)
ठाकरे विरुद्ध भाजप रंगणार सामना
पोटनिवडणूकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. सोबतच आता मनसेकडूनही जर भाजपला पाठिंबा मिळाला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ही निवडणूक जड जाऊ शकते.
राज्यातील सत्तासंघर्षानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारतं याकडेचं सर्वांचंच लक्ष लागून आहे. निवडणुकीत आपल्याच उमेदवाराचा विजय होईल असा दावा दोन्ही गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.