राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशला (MMR) जागतिक आर्थिक केंद्रात रूपांतरित करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीठी पहिलें पाऊल उचललं आहे. या उपक्रमाच्या माध्यामातून MMR ला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत MMR च्या विस्तीर्ण 6,355 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रातील सुरुवातीच्या टप्प्यात 1,250 चौरस किलोमीटर परिसरात मेट्रो, रस्ते, पूल, मलनिस्सारण व्यवस्था तसेच अन्य पायाभूत सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
MMRDA कडून पालघर, वसई, पनवेल, खालापूर, पेण, आणि अलिबाग तालुक्यातील 446 गावांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. या गावांमध्ये अद्यापपर्यंत असंगठित आणि तात्पुरता विकास झाला आहे, मात्र आता या गावांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. यात मेट्रो कनेक्टिव्हिटीसह रस्ते, पूल, नवीन मलनिस्सारण आणि ड्रेनेज लाईन्स, तसेच स्थावर मालमत्तेच्या विकासाच्या कठोर नियमानुसार सर्वांगीण विकास होणार आहे.
महाराष्ट्र सरकारने MMR ला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने तयार केलेली ही योजना विविध उद्योगांवर लक्ष केंद्रीत करेल, ज्यात आर्थिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य, शिक्षण, जागतिक विमानसेवा आणि मनोरंजन यांचा समावेश असणार आहे. या उद्योगांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. राज्याने 2029-30 पर्यंत MMR ला 300 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. जे NITI आयोगाच्या मार्गदर्शनाखाली असलेली एक मोठी योजना आहे.
MMR योजनेचा समावेश आधीपासूनच सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये वाढवन बंदर, पालघरमधील बुलेट ट्रेन स्थानक, पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गिका, आणि विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांचा समावेश होतो. हे सर्व प्रकल्प MMR अंतर्गत जोडून आणखी चांगल्या प्रकारे विकास करण्यात येणार आहे.
MMRDA च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ अलीकडेच एक आदेश प्राप्त झाला असून, MMRDA ला 1,250 चौरस किमी क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रायगड आणि पालघर जिल्ह्यातील या गावांसाठी एक सर्वसमावेशक विकास योजना तयार करण्यात येईल." अधिकृत आकडेवारीनुसार, या 446 गावांमध्ये 223 वसई आणि पालघर तालुक्यांमध्ये तर, उर्वरित गावं अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांमध्ये येतात. ही गावं विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करतील, ज्यामुळे MMR भविष्यातील जागतिक आर्थिक केंद्र होण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.