लोकसभा निवडणुकीत वाढलेला आत्मविश्वास महाविकास आघाडीसाठी विधानसभेत डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. २०१४ नंतर मोदी लाटेत भूईसपाट झालेल्या काँग्रेसने २०२४ मध्ये पुन्हा उभारी घेतली आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ दावेदार बनला आहे. उद्धव ठाकरे यांनी भावी मुख्यमंत्री म्हणूनच प्रचार सुरू केला आहे. मात्र शरद पवार यांनी ज्या पक्षाच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेलं असं म्हटलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं स्वप्न भंगणार की काँग्रेसमुळे महाविकास आघाडीला तडा जाणार, पाहूयात त्यावरचा एक रिपोर्ट
2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. मात्र महाविकास आघाडीत काँग्रेसचं स्थान कायम कमकुवतच राहिलं. कारण, 288 जागांमधून काँग्रेसचे केवळ 44 आमदार निवडून आले होते. मात्र राजकारणात अनेक शक्यता असतात. त्या शक्यता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशाने पाहिल्या. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगलं प्रदर्शन करत महाविकास आघाडीत कमी जागा लढवूनही सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ५ वर्षांपूर्वी साधं मंत्रीपदही हक्काने मागू न शकणारा पक्ष आज मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवू पाहात आहे.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदावर कॉंग्रेसची नजर असेल. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी, पुढचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच असेल असं म्हटलं होतं. तर नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या एका पक्षाच्या कार्यक्रमात अनेक नेत्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता. यामागे लोकसभा निवडणुकांचे निकाल आहेत. महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांमध्ये कॉंग्रेसचं प्रदर्शन सर्वोत्तम राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत १७ जागा लढवत १४ जागांवर विजय मिळवला आहे. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही कॉंग्रेसला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 21 जागांवर निवडणूक लढवली आणि 9 जागांवर विजय मिळवला होता. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने 10 जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवला.
आता विधानसभेच्या 288 जागांपैकी कॉंग्रेस 110-115 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेसाठी 90-95 आणि एनसीपीसाठी 80-85 जागा सोडल्या जाणार आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, कॉंग्रेसचं हाय कमांड 100 पेक्षा कमी जागांना सहमती दर्शवण्याची शक्यता कमी आहे.
उद्धव ठाकरे यांना आपला पक्ष आणि निवडणूक चिन्ह दोन्ही गमवावं लागलं आहे. लोकसभा निवडणुकांमध्येही शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा केवळ 2 जागा कमी मिळवल्या आहेत. तरीही उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री मानत असून त्यानुसार प्रचारही सुरू आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्र लढवली होती. त्यावेळी भाजपने 105 आणि शिवसेनेने 56 जागा जिंकल्या होत्या. पण पुढे युती तुटली आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनले. दरम्यान काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणांत, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कमी होत चालली आहे. या दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाची भेट घेतली आणि मुख्यमंत्रिपदाचा फॉर्मुला बदलण्याची मागणी केली, असं आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाला मुख्यमंत्रिपद देण्याचा परंपरागत फॉर्मुला आघाडीला कमजोर करतो, असं त्याचं मत असल्याचं या वृत्ता म्हटलं आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे दिल्लीला जागा-वाटपावर चर्चा करण्यासाठी गेले होते. असं सांगितलं जात आहे की त्यांनी जवळपास 100 जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी केली होती.
उद्धव ठाकरेप्रमाणेच शरद पवार यांच्या हातातूनही पक्ष आणि निवडणूक चिन्ह निसटलं आहे. पण ठाकरेप्रमाणेच पवार देखील स्वतःला कमी समजत नाहीत. अजित पवार यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये हरवण्यासाठी ते चाणक्याप्रमाणे रोज नवीन-नवीन योजना आखत आहेत. 2024 मध्ये महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदासाठी चेहरा कोण असेल, याबद्दल एनसीपी शरद पवार पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या संकेतांमुळे राजकीय तापमान वाढत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, शरद पवार रोहित पवार यांच्या मतदारसंघ जामखेड तालुक्यातील खरदा येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि समर्पण सोहळ्यात सहभागी झाले होते, जिथे त्यांनी लोकांशी संवाद साधला आणि काही असे वक्तव्य केले की त्यानंतर रोहित पवार मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात, असे मानलं जात आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत सर्वाधिक यश एनसीपी शरद पवार यांच्याच पदरात पडलं आहे. एनसीपी (शरद पवार) ने एकूण 10 जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी 8 जागां जिंकण्यामागे शरद पवार यांच्या लोकप्रियतेचं द्योतक आहे.
महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षच सर्वात प्रभावी आहे. तर राज्य आणि स्थानिक पातळीवर नेत्यांची दुसरी फळीही तयार आहे. पक्ष फूटीमुळे मोठे नेते शिंदे आणि अजित पवरांसोबत गेले आहेत. एनसीपी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्याकडे मात्र चांगल्या नेत्यांचा अभाव आहे. या दोन्ही पक्षांची महाराष्ट्रातील काही विशिष्ट भागांवर मजबूत पकड असली तरी मोठ्या नेत्यांची कमतरता जाणवणार आहे. त्याचा निवडणुकीत आणि नंतरही काँग्रेसला फायदा मिळण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.