पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग मूळ आराखड्यानुसार नेण्याची मागणी रेटून धरणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी आता या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात त्यांना पत्रकारांनी या मार्गाबाबत विचारणा केली. त्यावर बोलताना हा प्रश्न सभागृहात मांडण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मी केलं. पण सभागृहात हा प्रश्न सुटला नाही, तर आंदोलन उभारून रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असं वक्तव्य आमदार सत्यजीत तांबे यांनी केलं.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमानिमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी मुंबईतील पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी तांबे यांना पुणे-नाशिक मार्गात नेमका का बदल झाला, तसंच सभागृहात हा प्रश्न सुटला नाही, तर तुमची पुढची दिशा काय असेल, याबाबत विचारणा केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या मुद्द्यावर तांबे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून मागणी केली आहे. त्याच वेळी पुणे-नाशिक रेल्वेमार्ग ज्या भागातून जातो, त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना पत्र पाठवून हा मार्ग मूळ आराखड्यानुसारच नेण्यासाठी लढा देण्याची विनंती केली आहे. त्यांनी आपल्या या मागणीचा पुनरुच्चार केला. २०१७-१८ मध्ये सर्वेक्षण झाल्यानंतर हा मार्ग सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, राजगुरूनगरमार्गे पुण्याला नेण्याचा आराखडा मंजूर झाला. मात्र, आयत्या वेळी हा मार्ग शिर्डीवरून नेण्याचा द्राविडी प्राणायम राज्य सरकारने केला, असं तांबे यांनी नमूद केलं. (Latest Marathi News)
हा मार्ग राज्य सरकारच्या महारेल या कंपनीद्वारे बांधण्यात येत आहे. मात्र मध्य रेल्वेचीही त्यात भागीदारी असून मध्य रेल्वेला नाशिक आणि शिर्डीही या मार्गाला जोडायचं आहे. त्यामुळे सिन्नर, संगमनेर, पुणे हा मार्ग सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असल्याने तेथे बोगदे आणि पूल बांधायला जादा खर्च येणार असल्याचं मध्य रेल्वेचं म्हणणं आहे. त्यामुळे या मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करून तो शिर्डीमागे वळवण्यात आल्याचं तांबे यांनी स्पष्ट केलं. मात्र, हे कारण सयुक्तिक नसून शिर्डीमार्गे ही रेल्वे गेल्यास या प्रकल्पाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार आहे. त्यामुळे आमचा त्याला विरोध असल्याची भूमिका तांबे यांनी घेतली.
हा मार्ग हायस्पीड असून ताशी २०० ते २५० किमी वेगाने रेल्वे धावणार आहे. सध्या वंदे भारत या गाडीचा वेगही एवढा नाही. त्यामुळे हा प्रकल्प नाशिक, सिन्नर, संगमनेरसह अनेक तालुक्यांसाठी महत्त्वाचा आहे. आम्हाला लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांचे प्रश्न सभागृहात मांडण्याचा अधिकार आहे. पण सभागृहात प्रश्न मांडूनही तो सुटत नसेल, तर मग रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहातील मांडणी आणि आंदोलन यांची जोड मिळावी लागते. या प्रश्नाबाबतही तोडगा न निघाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असं सत्यजीत तांबे म्हणाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.