जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार झाल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी देखील वातावरण तापलं आहे. या घटनेचे पडसाद आता मुंबईत देखील पाहायला मिळत आहेत. मुंबईत मरीन ड्राईव्हवर ठाकरे गटाच्या वतीने आंदोलनाला सुरूवात झाली आहे. (Latest Marathi News)
आंदोलनासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात मोठ्याप्रमाणावर तरुण तसेच ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकवटले आहेत. मराठा समाजावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ येथे आज सकाळपासूनच आंदोलनाला सुरुवात झालीये. आंदोलनामुळे परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. पोलिसांनी मरीन ड्राईव्हवर आंदोलन करण्यास मज्जाव करत आझाद मैदानात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र कार्यकर्ते आंदोलन करण्यावर ठाम आहेत.
लातूर बार्शी रोडवर मराठा आरक्षणाची पुन्हा ठिणगी...
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ उमटणारे पडसाद कमी होताना दिसत नाहीत. आज लातूर शहरासह जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. मात्र रात्री अचानक लातूर बार्शी महामार्गावरील साखरापाटी इथं काही तरुणांनी महामार्गावर टायर पेटवून देत रास्ता रोको केलाय. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर काही काळ वाहतुक देखील ठप्प झाली होती. मात्र पोलिस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत वाहतुक सुरुळीत केली आहे.
जालन्यात आजही तणावपूर्ण शांतता
जालन्यात गेल्या २ दिवसांत जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी ७५० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर १५ आंदोलकांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. मराठा आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ८ तारखेला होणारा शासन आपल्या दारी कार्यक्रम देखील पुढे ढकलल्याची माहिती मिळाली आहे.
शनिवारी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी ५४ अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तर १४ रबर बुलेटचे राऊंड फायर केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज अंबड उपजिल्हा रुग्णालयात जखमी आंदोलकांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देखील आज आंदोलनस्थळी येण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.