राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय आता गांभीर्याने घ्यावा. येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. चालढकल करण्याचा प्रयत्न केला, तर मराठ्यांचं शांततेत सुरू असलेलं आंदोलन तुम्हाला पेलणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. ते शिवनेरी किल्ल्यावरून बोलत होते. (Latest Marathi News)
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आता राज्यभरात सभा घेत आहेत. या सभेतून ते राज्य सरकारकडे वारंवार आरक्षणाची मागणी करीत आहेत. आज जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यातील खेड आणि बारामती तालुक्यात जंगी सभा होणार आहे.
या सभेसाठी जरांगे यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Eknath Shinde) इशारा दिला. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आम्ही आरक्षणासाठी ४ दिवसांचा वेळ दिला होता. मात्र, राज्य सरकारने ३० दिवसांचा वेळ वाढवून मागितला. त्यापुढेही आम्ही १० दिवसांचा वेळ वाढवून दिला, असं जरांगे पाटील म्हणाले.
आता राज्य सरकारला दिलेली मुदत संपत आहे. येत्या २४ तारखेपर्यंत राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचा आहे. कुठलीही चालढकल करण्याचा प्रयत्न केला, तर शांततेत होणारं मराठा आंदोलन तुम्हाला पेलणार नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही तसूभरही मागे हटणार नाही, असंही जरांगे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे जालन्यातील कार्यकर्ते सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत वांद्रे येथील उड्डाणपुलावरील विजेच्या खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून देखील जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. कावळे यांच्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार आहे. आम्ही त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.