मालाडमध्ये २५ लाखांची फसवणूक; आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात

Malad Police Bust Interstate Fake Gold Scam: बनावट सोन्याचे दागिने विकून २५ लाखांची फसवणूक करण्यात आली. मालाड पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला, तसेच त्यांना जेरबंद केलं.
Malad Police Bust Interstate Fake Gold Scam
Malad Police Bust Interstate Fake Gold ScamSaam
Published On

संजय गडदे, साम टिव्ही

खोदकामादरम्यान सोन्याचे दागिने सापडल्याचे खोटे सांगून बनावट दागिने विक्री करत तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सराईत आंतरराज्यीय टोळीला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ८८३/२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी दिनेश मेहता (वय ५१, रा. मालाड पश्चिम) असून, २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आरोपी बाबुलाल वाघेला याने राजस्थानी भाषेत संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन केला. नाशिक येथील एका मंदिरामागे खोदकाम करताना सुमारे ९०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सापडल्याचे सांगून आरोपीने ते दागिने विक्रीसाठी मदत किंवा थेट खरेदी करण्याचे आमिष दाखवले. सॅम्पल म्हणून दिलेले मणी सोन्याचे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर फिर्यादीने आरोपीकडून दागिने खरेदी करत २५ लाख रुपये रोख दिले. मात्र सोनाराकडे तपासणी केल्यानंतर हे दागिने बनावट असल्याचे उघड झाले.

Malad Police Bust Interstate Fake Gold Scam
बॅगेत दगड भरून तलावात उडी मारली, कोल्हापुरात डॉक्टरने आयुष्य संपवलं, टोकाचा निर्णय का घेतला?

फसवणूक लक्षात येताच फिर्यादीने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल क्रमांक आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तब्बल १०० हून अधिक कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यातून सुमारे पाच आरोपींचा सहभाग उघड झाला. डम्प डेटा व सीडीआर विश्लेषणातून चार आरोपींचे मोबाईल क्रमांक निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलिसांनी प्रथम गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातून मुख्य आरोपी बाबुलाल भलाराम वाघेला (वय ५५) याला अटक केली. त्याच्या घरझडतीत गुन्ह्यातील रक्कमेतून १५ लाख ४५ हजार रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला. त्याच्या चौकशीत पत्नी कोकुबाई वाघेला हिचा सहभाग समोर आल्याने तिला बी.एन.एस.एस. कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर मालाडला आणून न्यायालयात हजर करण्यात आले.

Malad Police Bust Interstate Fake Gold Scam
लग्न आटपून घरी परतताना भीषण अपघात! सिमेंट मिक्सर अन् रिक्षाची धडक; २ जणांचा जागीच मृत्यू, ७ जखमी

यानंतर विरार पूर्व येथून मंगलाराम वाघरी, केसाराम वाघरी आणि भवरलाल वाघरी या तीन आरोपींनाही अटक करण्यात आली. सर्व आरोपी मूळचे राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील असून विविध राज्यांत फिरून अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुख्य आरोपी बाबुलाल वाघेला याच्यावर गुजरातमध्ये यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणात गोविंद नावाचा सुमारे ३० वर्षांचा एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आतापर्यंत १५.४५ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून उर्वरित मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या संपूर्ण कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत काळे व दीपक रायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. मालाड पोलिसांच्या या कारवाईमुळे आंतरराज्यीय फसवणूक टोळीचा पर्दाफाश झाला असून नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मालाडमध्ये २५ लाखांची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत

मालाड येथे खोदकामात सोन्याचे दागिने सापडल्याचे खोटे सांगून बनावट दागिने विक्री करत २५ लाखांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी बाबुलाल वाघेला,मंगलाराम वाघरी, केसाराम वाघरी आणि भवरलाल वाघरी अशी चौघांना अटक करण्यात आली असून एका महिला आरोपीला नोटीस देण्यात आली आहे. तपासादरम्यान गुजरात व विरार येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून १५.४५ लाख रुपये रोख व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मुख्य आरोपीवर यापूर्वीही गुजरातमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात अजून काही आरोपी आहे का या बाबत शोध व पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com