पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. मागील आठवड्यात वसंत मोरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. लवकरच मी शिवसेनेत प्रवेश करणार असं वसंत मोरे यांनी जाहीर केलं होतं. आज ते आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधणार आहेत.
दुपारी १२ वाजेच्या दरम्यान मातोश्री या ठिकाणी वसंत मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. वसंत मोरे (Vasant More) याआधी मनसे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतून (Mahavikas Aaghadi) उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. तसेच पुण्यातून लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती.
लोकसभा निवडणुकीनंतर आता वसंत मोरे हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे त्याच अनुषंगाने वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात (Uddhav Thackeray) प्रवेश करत असल्याची माहिती आहे. वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशाने पुण्यात उद्धव ठाकरे यांची ताकद वाढणार आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चबांधणी केली आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर शहरातील भाजपच्या ८ ते ९ माजी नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यामध्ये माजी महापौर राजू शिंदे यांचा देखील समावेश आहे. राजू शिंदे हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. त्यामुळे संजय शिरसाठ यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.