धर्माच्या नावाने मते मागितल्यास निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग होत नाही का? असं करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी आहे का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहलं आहे.
याविषयी निवडणूक आयोगाने एकदाचे स्पष्टीकरण द्यावे आणि भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी देखील या पत्रात करण्यात आली आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी हे पत्र लिहलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नुकत्याच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजप नेत्यांनी उघडपणे धर्माच्या नावाने प्रचार केलाचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहत जाब विचारला होता.
आचारसंहितेचे नियम शिथील केले आहेत का? तसा काही बदल केला असेल तर त्याबाबत निवडणूक आयोगाने देशातील सर्व पक्षांना आणि मतदारांनाही अवगत करावे, अशी मागणीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या पत्रात केली होती. यावर निवडणूक आयोगाकडून कोणतंही उत्तर आलं नाही.
त्यामुळे ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला स्मरणपत्र लिहत विचारणा केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्रावर निवडणूक आयोग काय उत्तर देणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, यावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
पत्रात नेमके काय?
निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून धार्मिक आधारावर उघडपणे केली जाणारी आवाहने तसेच धर्माच्या नावावर मागितली जाणारी मते यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते की नाही याविषयी निवडणूक आयोगाने एकदाचे स्पष्टीकरण द्यावे आणि भूमिका स्पष्ट करावी, असं ठाकरे गटाकडून विचारण्यात आलं आहे.
आधीच्या पत्रावर आयोगाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मग, निवडणूक प्रचारात धर्माच्या आणि देव-देवतांच्या नावावर मतदारांना आवाहन करत मते मागण्याची सरसकट परवानगी आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिली आहे, असे आम्ही गृहित धरायचे का, अशी विचारणाही ठाकरे गटाने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.