

ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याची हत्या
प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही व्हिडीओ समोर
मनोरमानगरमध्ये घडली हत्याकांडाची घटना
ठाण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची हत्या करण्यात आली. ऑफिसमध्ये घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या शिवसेना नेत्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या हत्याकांडाच्या घटनेने ठाणे हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्यावर २ जणांनी गोळीबार केला. ठाण्याच्या मनोरमानगर परिसरात ही घटना घडली. गोळीबारात शिवसेना नेते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ आर मॉलजवळील इन्फिनीटी हाँस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. प्रदीप पुर्णेकर यांची हत्या करणारे दोन आरोपी तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून त्यांच्या ऑफिसच्या दिशेने जात असताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली आहे. हल्लेखोर सध्या फरार आहेत. कापूरबावडी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
प्रदीप पुर्णेकर यांच्यावर दोनपेक्षा जास्त गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. शरीरात गोळ्या घुसल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सध्या कापूरबावडी पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळावर तपास करत आहे. दरम्यान, प्रदीप पुर्णेकर हे मानपाडा आझादनगर, गणेश नगर भागातील नागरिकांकरिता एका विषयाच्या माध्यमातून आंदोलन करणार होते. मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.