BJP vs Mahavikas Aghadi : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय रण पेटलेलं आहे. हा मुद्दा उद्या, शनिवारी चांगलाच तापणार असून, महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. तर भाजप मुंबई 'माफी मांगो' आंदोलन करणार आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उद्या, शनिवारी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा टीझरच महाविकास आघाडीकडून व्हिडिओ रुपाने प्रसिद्ध केला आहे. तर संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरून केलेल्या वक्तव्यावरूनही भाजप आक्रमक झाला आहे. भाजप मुंबईतर्फेही उद्या शहरात माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Latest Marathi News)
हिंदू-देवदेवता आणि महापुरूषांबद्दल वारंवार अपमानास्पद वक्तव्ये करून समाजाच्या भावना दुखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात मुंबई भाजपतर्फे उद्या संपूर्ण मुंबईमध्ये “माफी मांगो” आंदोलन करणार, असं आशिष शेलार म्हणाले. (Sanjay Raut)
आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील दोन पुस्तके भाई गिरकर यांनी पाठवली आहेत. ती संजय राऊतांनी वाचावी आणि इतिहास समजून घ्यावा.
डॉ. बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या जन्मस्थानाचा वाद अफगाणी सेनेने निर्माण केला आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना हे का करत आहे? आपलं अज्ञान संजय राऊत हे कायम पाजळत असतात. त्यांना डॉक्टर औषधे देतो की कम्पाऊंडर हेच कळत नाही.
बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं ते तरी उद्धवजींच्या शिवसेनेला मान्य आहे का?
संजय राऊत सामनात सर्व काही उद्धवजींमुळेच मिळालं असल्याचं छापायलाही कमी पडणार नाहीत.
ऐवढा वाद झाल्यानंतरही राऊत यांनी साधी माफी मागायची तसदी घेतली नाही.
ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने निवडणुकीत पाडलं, त्याच काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे गेले.
महामानवाविषयी केलेली ही वक्तव्ये उद्धव ठाकरे कसे मान्य करू शकतात?
मुंबईच्या सहाही परिक्षेत्रात आमदार-पदाधिकारी काळे झेंडे घेऊन याचा निषेध करणार
संजय राऊत हे आजपर्यंत अहंकारात अधोगतीला गेले आहेत. ते आणखी जाऊ नये अशी माझी अपेक्षा आहे.
राऊतांनी स्वत:लाच कळतं ते शहाणपण हा अहंकार बाजूला ठेवावा आणि अधिक शिक्षणासाठी रामभाऊ म्हाळगीत जावे.
नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपला हे मान्य नाही.
Edited by - Nandkumar Joshi
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.