
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना धक्का बसला
शिंदे सरकारच्या काळात घेण्यात आलेला निर्णय फडणवीस यांनी केला रद्द
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीला दिलेली कार्यालयाची जागा परत घेण्यात आली.
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सरकारकडून घेण्यात आलेला आणखी एक महत्वाचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना देखील झटका बसला आहे. प्रहार जनशक्तीच्या मुंबईतल्या मंत्रालयाजवळच्या कार्यालयाची जागा जनता दल सेक्युलरला देण्यात आली.
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आली होती. मंत्रालयाजवळ जीवन बिमा मार्ग येथे ९०९ चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती.
त्यातील फक्त २०० चौरस फूट जागा शिंदे सरकारने जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून बाकी ७०० चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आली होती. पण आता बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून या निर्णयात बदल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांचा निर्णय बदलण्यात आल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करुन महायुतीसोबत जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बच्चू कडू यांना सरकारकडून दणका देण्यात आला आहे. तर बिहारमध्ये भाजपसोबत मित्र पक्ष म्हणून राहिलेल्या जनता दल सेक्युलरला पुन्हा संपूर्ण जागा देण्यात आली आहे. यामुळे आता महायुतीमध्ये अंतर्गत तणाव निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.