Maharashtra Political news: राज्याच्या राजकारणातून मोठं वृत्त हाती आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आमदार आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी नोटीस जारी केली आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या नोटीशीनंतर आता अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदार काय पुरावे सादर करणार, हे पाहावे लागणार आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवेसेनेच्या ४० आमदार आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस जारी केली आहे. विधीमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे. तसेच अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहे.
निवडणूक आयोगाकडून विधीमंडळास शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त देखील झालं आहे. विधीमंडळाकडून शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाने शिंदेंच्या शिवसेनेचा प्रतोद बेकायदेशी असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांचा व्हिप लागू होऊ शकतो. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल असलेली आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकेवर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नार्वेकर काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
नार्वेकरांकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे शिंदे गटाच्या १६ आमदारांवर आपत्रतेची टांगती तलवार आहे. नार्वेकरांकडे दाखल याचिकेमुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १५ आमदारांचं भवितव्य धोक्यात आलं आहे.