कोयता गँग आणि गाड्यांची तोडफोडीचे सत्र सुरू असतानाच कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमुळे पुणे हादरलं. शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मोहोळचा मृत्यू झाला. नेमकं गँगस्टर शरद मोहोळ होता कोण आणि यावरून आता पुण्यातील टोळी युद्धाने पुन्हा डोकं वर काढलय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)
वेळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे, ठिकाण पुण्यातील कोथरूड भागातील सुतरदरा परिसर. एरवी दुपारी अगदी शांत असणारा परिसर आज मात्र बंदुकीच्या आवाजाने हादरला. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या. दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी त्याचं काम केलं आणि पळून गेले. पोटात, छातीवर गोळ्या लागल्याने शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. स्थानिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या शरद मोहोळवर तो दुचाकीवरून जात असताना अज्ञात ३ आरोपींनी मोहोळ याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या आणि यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता. शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
शरद मोहोळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील आरोपी असून सिद्दीकीचा येरवडा कारागृहात गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणात मागील वर्षी शरद मोहोळला जामीन मिळाला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा व्यक्ती मात्र अलीकडच्या काळात सगळ्या काळया गोष्टी मागे ठेवत समाज कार्यात चांगल्या प्रकारे गुंतला होता. मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी देखील अलीकडेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दुसऱ्या बाजूला, शरद मोहोळची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली असून पोलीस तपास करत आहेत आणि यातून पुण्यात कुठलेच गँगवॉर सुरू झालेलं नाहीये, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
शरद मोहोळ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन आरोपी पैकी एका आरोपीचे नाव निष्पन्न केले आहे. साहिल पोळेकर असे त्याचे नाव असून त्याचा आणि त्याच्या इतर साथीदारांचा कसून शोध पोलिसांकडून सुरू आहे.
शरद मोहोळ याच्या मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेतील. मात्र या घटनेमुळे अलीकडच्या काळात शमलेली पुण्यातील टोळीयुद्ध आणि भाईगिरी पुन्हा उदयास आली का असा प्रश्न नक्की निर्माण होतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.