

संघर्ष गांगुर्डे, प्रतिनिधी साम टीव्ही
Mahayuti internal conflict ahead of municipal elections : महापालिका निवडणुकीसाठी राज्यात जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच महायुतीमधील अंतर्गत मतभेद, वाद चव्हाट्यावर आलाय. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप करत युतीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर त्याला शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी सडेतोड शब्दात प्रत्युत्तर देत थेट इशाराच दिला आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये अंतर्गत वादाचा नवा अंक सुरू झालाय.
भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील म्हणाले की, २०२४ मध्ये भाजपच्या सुलभा गायकवाड यांच्या विरोधात शिवसेनेने महेश गायकवाड यांना बंडखोर म्हणून उभे केले. त्यांना मिळालेली ५४ हजार मते कुठून आली? ती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या मदतीमुळेच आली आहेत. चार महिन्यांनंतर त्यांना पुन्हा पक्षात घेतले गेले. युतीत असे चालत नाही. आम्ही कुठे तरी चुकलो असू, पण आम्ही कधीच पाठीत खंजीर खुपसलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
या टीकेला उत्तर देताना शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी भाजपवरच पलटवार केला. खरी युती ही बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांची होती. आज काही लोकांनी विचार बदलले आहेत. आम्ही नेहमीच प्रामाणिकपणे युतीचे काम केले आहे. खासदार शिंदे यांच्या निवडणुकीत भाजपचे काही आमदार विरोधी पक्षाच्या उमेदवारांसोबत गळाभेट करत होते,असा आरोप त्यांनी केला.
भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणतात की शिवसेनेने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. मात्र आमच्या नेत्यांचा वेळोवेळी अपमान करणे त्यांनी थांबवावे. विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी मला उभे केले असते तर मला ५५ हजार नव्हे तर १ लाख १० हजार मते मिळाली असती. आणि मी आमदार असतो, असे महेश गायकवाड म्हणाले.
कल्याण पूर्वेत भाजपचा एक नगरसेवक निवडून येणे कठीण होते. युतीमुळेच तो निवडून आला. आमची ताकद दाखविण्याची वेळ आणू नये. उगाच वल्गना करू नयेत. स्वबळावर एकदा होऊनच जाऊ द्या. विधानसभेत शिवसेनेचा एक मावळा भारी पडला सगळे एकवटले तर तुमचा सुपडा साफ होईल,असा थेट इशाराच गायकवाड यांनी दिला. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे कल्याण पूर्वेत महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीतील तणाव अधिक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.