

केडीएमसी निवडणुकीसाठी भाजप–शिंदे गट युतीचे संकेत.
जागा वाटपाचा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात.
महापौरपदासाठी दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा तीव्र
संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्युज
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपा आणि शिवसेना शिंदे गट युतीने निवडणूक लढवण्याचे संकेत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात जागा वाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नसून हा तिढा सध्या तरी गुलदस्त्यातच असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
पालिकेवर आपलाच महापौर बसवण्याच्या स्पर्धेत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने आपापले संख्याबळ वाढवण्यावर भर दिला आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी अन्य पक्षांतील माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचा सपाटा लावला असून, यामुळे वाढीव जागांवर दावा कोणाचा, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी युतीचे संकेत असले तरी प्रत्यक्ष जागा वाटपावरून दोन्ही पक्षांत अंतर्गत चढाओढ दिसून येत आहे.
मागील महापालिका निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे ५३ तर भाजपाचे ४३ नगरसेवक निवडून आले होते. त्याखालोखाल मनसेचे ९, काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि इतर पक्ष व अपक्ष मिळून ११ नगरसेवक होते. यंदा प्रथमच चार सदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणूक होणार असल्याने राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. युतीला पोषक पॅनल तयार करण्याचा आरोप विरोधकांकडून होत असून, पराभवाच्या भीतीने अनेक माजी नगरसेवक सत्ताधारी युतीकडे वळत असल्याचेही चित्र आहे.
शिवसेनेतील फाटाफुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटअसे दोन स्वतंत्र पक्ष झाले. केडीएमसीतील तत्कालीन शिवसेनेचे सुमारे ४५ ते ५० माजी नगरसेवक शिंदे गटात गेले, तर केवळ दोन ते तीन माजी नगरसेवक उबाठा गटात राहिले. त्यानंतर शिंदे गटातील चार माजी नगरसेवक भाजपात गेल्याने शिंदे गटाची संख्या ४६ वर आली होती. मात्र भाजपाचे चार माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने ही संख्या पुन्हा ५० वर पोहोचली.
सद्यस्थितीत शिवसेना शिंदे गटाने मनसे, काँग्रेस, अपक्ष तसेच एमआयएम व बसपा अशा विविध पक्षांतील एकूण ११ माजी नगरसेवकांना प्रवेश दिला असून, शिंदे गटाकडे एकूण ६१ माजी नगरसेवकांचे संख्याबळ झाले आहे. दुसरीकडे भाजपाकडे सुरुवातीला ४३ माजी नगरसेवक होते. त्यातील काहींची अदलाबदल झाल्यानंतर आणि अन्य पक्षांतील सहा माजी नगरसेवकांना प्रवेश दिल्यानंतर भाजपाचे संख्याबळ सध्या ४९ वर पोहोचले आहे.
अद्यापही शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष असे मिळून सुमारे १२ माजी नगरसेवक तटस्थ आहेत. हे नगरसेवक कोणत्या पक्षात प्रवेश करणार की तटस्थ राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच अन्य पक्षांतून प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांच्या जागा संबंधित पक्षाच्या वाट्याला जाणार की युतीत सामायिक वाटप होणार, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.
एकंदरीत भाजपा–शिवसेना शिंदे गट युतीने महापालिका निवडणूक लढवण्याचे संकेत स्पष्ट असले तरी वाढलेल्या संख्याबळामुळे जागा वाटपाचा तिढा कसा सोडवला जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे युती जाहीर असली तरी प्रत्यक्ष रणनिती ठरवताना दोन्ही पक्षांना कसरत करावी लागणार, हे मात्र नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.