दिलीप कांबळे
Ashadhi Wari 2023 Maval News: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी लाखो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहूनगरीत दाखल होत असतात आणि पवित्र इंद्रायणी नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असतात. पण याच पवित्र समजल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. (Latest Marathi News)
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली संत तुकाराम महाराज यांच्या देहू मधील इंद्रायणी नदी पवित्र समजली जाते. पण या नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन पात्रालगत मृत माशांचा खच पडला आहे.
त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत माशांची संख्या वाढत असतानाही नगरपंचायत प्रशासनाने पावले न उचलल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
उन्हाळ्यात इंद्रायणी नदी पात्रातील पाणीसाठ्यात घट होत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात देहू गावातील सांडपाणी मिसळत आहे. पाणी गढूळ झाले असून पाण्यावर जलपर्णीचा वेढा पडला आहे. अपुऱ्या ऑक्सिजन मुळे मासे मृत होत असल्याची शक्यता आहे.
हे सांडपाणी मिश्रित पाणी वारीच्या वेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करत असतात. त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Maval News)
मृत झालेले मासे हे कशामुळे मृत झाले याबाबत नगरपंचायत देखील अनभिज्ञ आहे. त्यामुळे या पाण्याचे नमुने नगरपरिषदेच्या वतीने तपासणी साठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर च इंद्रायणी प्रदूषित आहे की नाही हे स्पष्ट होऊन उपाययोजना करण्यात येतील नगरपंचायतीकडून असं सांगण्यात आले आहे.
तर एसटीपी प्लांटच्या माध्यमातून पाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी इंद्रायणी नदीच्या (Indrayani River) डोहात सोडलं जाण्याचा दावा केला जातोय, दुसरीकडे देहूतील काही धर्मशाळा यांचे सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडल्या जात असल्याने अश्या धर्म शाळेवर लवकरच कारवाई करण्यात येण्याचा इशारा देहू नगर पंचायत प्रशासनाने दिलाय.
येणाऱ्या वारी सोहळ्यापर्यंत तरी उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येणार का असा सवाल भाविक करू लागले आहेत. कारण इंद्रायणी नदीचं पाणी दूषित झालं आहे, त्यामुळे भाविकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.