अभिजीत देशमुख, कल्याण
Kalyan Rain Live Updates : ठाण्यासह डोंबिवली आणि कल्याणमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांवर पाणी साचले आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील रूळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लोकल वाहतूक मंदगतीने सुरू आहे. लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
कल्याणमध्ये संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका लोकल सेवेलाही बसला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे लोकल वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे. (Mumbai Rain Alert)
कल्याण-डोंबिवलीत (Kalyan-Dombivli) आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. दुपारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पण दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढला. मागील तासाभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरात पाणी साचले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील इतर सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.
ठाण्यात संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा, आनंद नगर, ओवळा या ठिकाणी पावसाचे पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे पाणी साचलं आहे. मागील आठ तासांत 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मागील तासाभरात 25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातील पाचपाखाडी भागात एका सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली. सुदैवाने या घटनेत कुणाला दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.
हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागांत पुढील काही तास जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.