बदलापूर: बदलापूर नगरपालिकेत कचरा घोटाळा (Garbage Scam) झाल्याचा आरोप मनसेनं केलाय. बोगस व्यक्तीच्या नवे बदलापूर (Badlapur) शहरातील प्रस्थापित नगरसेवकच कचऱ्याचा ठेका चालवत असल्याचा आरोप मनसेचे (MNS) शहर सचिव भाई जाधव आणि महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी केलाय. याबाबत मनसेनं पुरावे देखील सादर केले असून याबाबत जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय. मनसेच्या या आरोपांमुळे बदलापूर शहरात खळबळ माजली आहे. (Garbage scam in Badlapur Municipality! MNS alleges that corporator is running the contract)
हे देखील पाहा -
बदलापूर शहरात घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरपालिकेकडून (Kulgoan Badlapur Municipal Council) ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. याच ठेकेदाराला यापूर्वी २०१५ साली सुद्धा ठेका देण्यात आला होता. त्यावेळी त्याने केलेल्या करारनाम्यावर असलेला ठेकेदाराचा फोटो आणि सही आणि आत्ताच्या करारनाम्यावर असलेला फोटो आणि सही ही वेगवेगळी असून नाव मात्र तेच असल्याचा मनसेचा आरोप आहे. त्यामुळं बोगस व्यक्तीच्या नावे बदलापूर शहरातील प्रस्थापित नगरसेवकच कचऱ्याचा ठेका चालवत असल्याचा आरोप मनसेचे शहर सचिव भाई जाधव आणि महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी माहितीच्या अधिकारात पालिकेतून कचऱ्याच्या ठेक्याची कागदपत्रंही काढली असून त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मनसेनं कचऱ्याच्या ठेकेदाराविरोधात पुराव्यासहित आरोप केले आहेत. यामध्ये २०११-१२ मध्ये २ कोटी ७० लाख रुपयांचा असलेला ठेका २०१६-१७ पर्यंत ६ कोटी ८७ लाख रुपयांवर गेला. त्यानंतर २०१७-१८ या वर्षी याच ठेक्याची रक्कम १२ कोटी ९८ लाख, म्हणजेच थेट दुप्पट झाली. त्यामुळं एका वर्षात शहराची लोकसंख्या दुप्पट झाली? की कचरा दुप्पट झाला? असा मनसेचा सवाल आहे. सोबतच हा ठेका देताना नियमानुसार राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दैनिकात निविदा सूचना प्रसिद्ध करणं गरजेचं असतानाही मर्जीतल्या ठेकेदारांचा फायदा करून देण्यासाठी तसं न केल्याचा मनसेचा आरोप आहे.
यवतमाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदणी प्रमाणपत्रात संबंधित ठेकेदाराची पात्रता ही ५० लाखांपर्यंतची कामं घेण्याची असताना या ठेकेदाराला ७ कोटी रुपयांचा ठेका बेकायदेशीर पद्धतीने देण्यात आला. डम्पिंग ग्राउंडवर वजनकाटा बसवणं बंधनकारक असतानाही खोट्या पावत्या तयार करून कोट्यवधी रुपयांची बिलं काढण्यात आली. हजेरीपटावर जास्त कर्मचारी दाखवून प्रत्यक्षात कमी कर्मचारी काम करत आहेत, या हजेरीपटात जिममध्ये काम करणारा, वडापावच्या गाडीवर काम करणारा, एखाद्या नगरसेवकाचा पीए अशा लोकांची नावं कर्मचारी म्हणून दाखवत खोटा पगार दिला जात आहे.
ठेकेदाराने घंटागाडी स्वतः खरेदी करणं गरजेचं असतानाही बदलापूर पालिकेनं स्वतः २ कोटी ६० लाख रुपये खर्च करून घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. शिवाय या घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणाही बसवण्यात आलेली नाही, असे अनेक आरोप मनसेचे भाई जाधव आणि संगीता चेंदवणकर यांनी पुराव्यासहित केले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पुराव्यांसहित न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असून नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तत्कालीन नगरसेवक या सगळ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं केली आहे.
मसनेच्या या आरोपांबाबत बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना विचारलं असता, या आधीही मनसेकडून याबाबत तक्रार करण्यात आली असून आत्ताही मनसेचं तक्रारीचं पत्र मला मिळालं आहे. हे पत्र मी संबंधित विभागाकडे चौकशीसाठी पाठवलं असून त्याचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मला पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यानुसार पुरावे आणि वस्तुस्थिती याची दखल घेऊन मी या प्रकरणाची तपासणी करणार आहे. त्यामध्ये जर काही अनियमितता आढळली, तर ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असं मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितलं आहे.
बदलापूर शहरात काही वर्षांपूर्वी अशाचप्रकारे टीडीआर घोटाळा बाहेर आला होता, ज्यामध्ये अनेक नगरसेवक आणि अधिकारी अडचणीत आले होते. यानंतर आता कचरा घोटाळ्यामध्ये जर काही अनियमितता आढळली, तर मात्र पुन्हा एकदा बदलापूर पालिकेचं नाव भ्रष्टाचारासाठी बदनाम होणार आहे. त्यामुळं आता प्रशासकीय चौकशीत काय समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.