संजय गडदे, साम टीव्ही
राज्यभरात 29 महापालिकांचा मोठा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. 30 डिसेंबर (मंगळवार) रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र या दिवशीच राज्यात हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला. कुठे एबी फॉर्मसाठी चित्रपटालाही लाजवेल असा थरार दिसला तर काही ठिकाणी थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला गेला. निष्ठवंतांना डावलून उपऱ्यांना उमेदवारी दिल्याने भाजप कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आल्याने पक्षामध्येच मोठा राडा झाला. अशातच राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेमध्ये महायुती विरुद्ध ठाकरे बंधु असा थेट सामना आहे. भाजप सर्वाधिक जागा लढत असल्याने शिंदे गटाला काही ठिकाणी एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. प्रभाग क्रमांक ८८ मध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेला तिकीट न मिळाल्याने त्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे.
शिंदे गटाच्या माजी नगरसेविका स्नेहल सुहास शिंदे यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी काल प्रभाग क्रमांक ८८ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निर्णयामुळे प्रभाग ८८ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक ८८ हा आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ साठी ही जागा भारतीय जनता पार्टीला देण्यात आल्याने, भाजपकडून डॉ. सामंत हे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
या पार्श्वभूमीवर स्नेहल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी स्वीकारल्याने या प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन होणार का, की बंडखोरीचा फटका कोणाला बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक पातळीवर या घडामोडींवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, येत्या काही दिवसांत प्रचाराला मोठा वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रभाग ८८ मधील ही निवडणूक लढत आता अधिकच रंगतदार आणि चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.