Ghatkopar Hoarding Collapse :
>> गिरीश कांबळे
होर्डिंग्ज मालकावर, मुंबई महानगरपालिका, रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस गृह निर्माण संस्थेतील संबंधित दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबईतील घाटकोपर येथील छेडानगर परिसरात महाकाय लोखंडी जाहिरात फलक वादळी वाऱ्यामुळे कोसळून पेट्रोल पंपावर पडल्याने मोठी दुर्घटना घडली. 120 X 120 चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात आदळल्यामुळे जवळ उभी असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्यात अडकले गेले. यातील सुमारे 14 जणांचा मृत्यू तर किमान 78 जखमी आहेत.
दानवे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, महानगरपालिकेची होर्डिंग उभारण्याची परवानगी जास्तीत जास्त 40 X 40 असून कोसळलेले होर्डिंग 120 X 120 चौरस फूट आकाराचे असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्य होर्डिंग लावण्यास परवानगी दिली. त्या सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. सदर घडलेल्या दुर्घटनेतील जागा ही रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येते. यामध्ये बेकायदेशीर होर्डिंग्ज ला रेल्वे पोलीसांनी मान्यता दिल्याची माहिती आहे. त्यामुळे परवानगी देण्यात येणाऱ्या संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशीचे आदेश देण्यात यावेत व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत.
तसेच यातील काही जागा महाराष्ट्र पोलीस गृह निर्माण संस्थेच्या ताब्यात होती. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांवर तेथील जागेची जबाबदारी होती. अशा सर्व अधिकाऱ्यांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच होर्डिंग्ज मालकाने नियमबाह्य व सुरक्षिततेचे कोणतेही नियमांचे पालन केलेले नसल्याने त्यांच्या सर्व होर्डिंग्जची मान्यता तात्काळ रद्द करून काळ्या यादीत समावेश करावा.
या दुर्घटनेमध्ये जखमी व मृत्यु पावलेल्या व्यक्तींना आवश्यक ती रक्कम संबंधित होर्डिंग मालकाकडून वसूल करून देण्यात यावी. तसेच यासारख्या घटना भविष्यात घडू नये यासाठी राज्यातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन धोकादायक होर्डिंग्ज काढण्याबाबत योग्य त्या सुचना देण्यात याव्यात. तसेच या दुदैवी घटनेत जखमी झालेल्या व्यक्ती, मृत व्यक्ती तसेच वाहने व इतर स्थावर मालमत्तेचे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने तातडीने देण्याबाबत उचित पावले उचलावित, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.