सुप्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे पुण्यात निधन झाले.
त्यांच्या नेतृत्वाखाली जैवविविधता आणि शाश्वत विकासावर महत्त्वाचे संशोधन झाले
त्यांनी IISc मध्ये पर्यावरण अभ्यासाचा मजबूत पाया रचला आणि ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली
भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ आणि पर्यावरण संरक्षण चळवळीचे मार्गदर्शक डॉ. माधव गाडगीळ यांचे काल रात्री उशिरा पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशाच्या पर्यावरणीय विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (गुरुवारी) दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. गाडगीळ यांचा जन्म २४ मे १९४२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण देखील पुण्यातच झाले. पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथून त्यांनी जीवशास्त्रातील पदवी शिक्षण घेतले. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात पीएच.डी. मिळवली. हार्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे तसेच उपयोजित गणितशास्त्र विभागाचे ते फेलो होते. १९७३ ते २००४ या कालावधीत ते बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. त्यांनी तेथे ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली. डॉ. गाडगीळ यांनी जैवविविधता संवर्धन, लोकसहभागातून नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या विषयांवर मोलाचे संशोधन व लेखन केले.
त्यांच्या पत्नी डॉ. सुलोचना गाडगीळ या पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेत हवामानशास्त्रज्ञ होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांचेही निधन झाले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २०१० मध्ये पश्चिम घाटाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर केला होता. हा अहवाल पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मैलाचा दगड मानला जातो.
डॉ. माधव गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच प्राध्यापकांच्या साहाय्याने देशातील जैवविविधतेचे सर्वेक्षण आणि संवर्धन या विषयांवर विविध अभिनव प्रयोग केले. भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, भारतीय विज्ञान अकादमी तसेच पर्यावरणाशी संबंधित विविध राष्ट्रीय समित्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज, अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ देशाने गमावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.