रश्मी पुराणिक, मुंबई: महाविकास आघाडी सरकारनं अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर, तसेच नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या नामांतराच्या निर्णयाला राज्यातील नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याचे वृत्त होते. मात्र, आम्ही नामांतराला स्थगिती दिलेली नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. (Devendra Fadnavis News Update)
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं विश्वास गमावला होता. ज्यावेळी राज्यपाल एखाद्या सरकारला पत्राद्वारे बहुमत सिद्ध करण्यास सांगतात, त्यावेळी कॅबिनेटची बैठक बोलावून कोणताही महत्वाचा निर्णय घ्यायचा नसतो, असा नियम आणि परंपरा आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. ते म्हणाले, की 'पूर्वी अनेकदा एखाद्या सरकारला राज्यपाल सांगायचे की तुमच्या सरकारचं बहुमत सिद्ध करा, त्यावेळी तातडीने कॅबिनेट बोलावून विधानसभा भंग करण्याचा निर्णय घ्यायचे. म्हणून असे प्रकार घडल्याने त्यावेळी कोर्टाने सांगितले की, बहुमत सिद्ध करण्याबाबतचे पत्र दिल्यानंतर सरकारने बहुमत सिद्ध करेपर्यंत कुठलाही निर्णय घेणे अयोग्य आहे.'
औरंगाबादचं (Aurangabad) सभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मंबुई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याविषयी जे काही ठराव केले होते, त्यावर पहिला प्रश्न त्या सरकारला विचारायला हवा. मागील अडीच वर्षांपासून ही मागणी होत होती. तेव्हा निर्णय घेतला नाही. पण ज्या दिवशी बहुमत गमावले तेव्हा कॅबिनेट बैठक घेतली आणि हे ठराव घेतले. ते संकेताला धरून नाहीत. म्हणून ही नावं द्यायचीच असल्याने वैधरित्या ज्या सरकारकडे बहुमत आहे, त्या सरकारचे मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आयुक्तांना सांगितले आहे. ही नावं महत्वाची आहेत. ती कोणत्याही अवैध बैठकीत देऊ नयेत. आमच्या पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे ठराव घेण्यात येतील. हे तिन्ही निर्णय आमचंच सरकार घेईल, अशी ठाम भूमिका फडणवीस यांनी घेतली. हे निर्णय घेतले, त्यावेळी सभागृहात आणि कॅबिनेटच्या बैठकीतही बहुमत नव्हतं. अर्धे लोक बाजूने होते की विरोधात होते हे माहीत नाही. काही लोक तिथे सोबत होते, बाहेर आल्यानंतर वेगळेच बोलले. आजही कुणाच्या मनात काय आहे, ते समजत नाही. अनेक लोक दुटप्पी बोलतात. पण आमचे मुख्यमंत्री ठाम आहेत, असे फडणवीस म्हणाले.
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. कामे रखडली आहेत, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता, फडणवीस म्हणाले, की 'त्यांचे पस्तीस-चाळीस मंत्री होते, पण त्यांचे अस्तित्व कुठेही दिसत नव्हते. कुठे पाऊस झाला तर, मुख्यमंत्री जात नव्हते. पण इथे आम्ही दोघेच आहोत, तरीही सगळीकडे जातो. त्यामुळे जे टीका करतात त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार आहोत, असं फडणवीस यांनी सांगितलं.
ते ओबीसी आरक्षणात जाणीवपूर्वक अडथळे आणतात- फडणवीस
ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ज्या लोकांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही, ते लोक जाणीवपूर्वक या वेळी अडथळे निर्माण करत आहेत. महत्वाचे हे आहे की, बांठिया आयोगाने २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तसा अहवाल कोर्टात सादरही केला आहे. ज्यांच्या काळात आयोग स्थापन केला, तेच लोक वेगळी भूमिका घेत आहेत. हा अहवाल राजकीय आरक्षणापुरता आहे. अन्य कुठला अभ्यास करायचा असेल, त्याकरिता आमचं सरकार तयार असेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
मातोश्रीची दारे सर्वांसाठी खुली आहेत, असे वारंवार उद्धव ठाकरेंकडून सांगितले जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी टोला लगावला.
हे दरवाजे आधी उघडले असते तर, ही वेळ आली नसती. पण आनंद आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. बाळासाहेबांचा विचार घेऊन शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार आहे, असे फडणवीस म्हणाले. पेट्रोल आणि डीझेलवरील कर कपात करण्याच्या निर्णयावर विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. ज्यांनी फुटकी कवडी लोकांना दिली नाही, त्यांना बोलायचा अधिकार तरी काय आहे. पंतप्रधानांनी सांगूनही एक नवा पैसा कमी केला नाही. पण आम्ही केला आहे. पुढे आणखी करू, असे ते म्हणाले.
राज ठाकरेंच्या भेटीवर भाष्य
फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्याबाबतही फडणवीस बोलले. या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. त्यात एकमेकांशी संबंध ठेवणे गैर नाही. राज ठाकरेंचं ऑपरेशन झाले. अनेक नेते भेटायला गेले. मी सभागृहातही सांगितलं होतं की मी जाणार आहे. मी भेटलो तर कुणाला मळमळायचं कारण काय आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
Edited By - Nandkumar Joshi
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.