
गणेशोत्सवानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी (ता. ३०) सकाळ माध्यम समूहाच्या साम वृत्तवाहिनीच्या मुंबईतील बीकेसी येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी 'साम'च्या कार्यालयात विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे देखील उपस्थित होते.
यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यंदाचा गणेशोत्सव 'राज्य महोत्सव' म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे यावर्षी राज्यभरात गणेशोत्सव भव्यदिव्य स्वरुपात साजरा होत आहे. साम वृत्तवाहिनीच्या कार्यालयातही विघ्नहर्ता गजाननाचे आगमन झाले आहे. गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे 'साम'च्या बीकेसी येथील कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकार आणि कर्मचाऱ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
'अध्यात्मिक शक्ती मिळते'
मला अतिशय आनंद होत आहे की सामच्या कार्यालयात विराजमान झालेल्या गणरायाच्या दर्शनासाठी आलो आहे. गणेशोत्सव हा राज्य महोत्सव आहे आणि गणेशोत्सव हा सामाजिक अभिसरणाचा महोत्सव आहे. समाजातील सर्व वर्ग यात सहभागी होतात. सर्वजण एकत्र येतात. एकत्रितपणे महोत्सव साजरा करतो. त्यातून एकीकरण होतं. नेतृत्व गुण तयार होतात. संघटनशक्ती तयार होते. अर्थातच या माध्यमातून आपल्याला एक अध्यात्मिक शक्ती मिळत असते, असे फडणवीस म्हणाले.
'सर्वांना सुबुद्धी देऊन सन्मार्गाने चालण्याची शक्ती मिळावी'
गणरायाकडे एकच मागणे मागायचे असते ते म्हणजे, मला आणि इतरांनाही सुबुद्धी दे. सर्वांना सुबुद्धी देऊन सन्मार्गाने चालण्याची शक्ती मिळावी. चांगल्या कार्याची सुरुवात ही श्री गणेशांपासून होते. सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य मिळू दे. सगळ्यांच्या आयुष्याची चांगली सुरुवात व्हावी, असे साकडे मी गणरायाला घालतो, असे यावेळी फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.