लग्न झालेल्या महिलेने परपुरुषासोबत सहमतीने शारीरिक संबंध ठेवले, तर तो बलात्कार म्हणता येणार नाही, असं मत हायकोर्टाने नोंदवलं. इतकंच नाही, तर महिलेने तिच्या प्रियकरावर दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा देखील कोर्टाने रद्द केला. मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर हा निर्वाळा दिला. (Latest Marathi News)
तक्रारदार महिलेची याचिकाकर्त्या पुरुषासोबत 2020 मध्ये ओळख झाली होती. दोघेही विवाहित असून त्यांना प्रत्येकी 2 मुले आहेत. ओळखीनंतर कालांतराने दोघांमध्ये प्रेम जडलं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले, की त्यांनी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
मात्र, महिलेच्या पतीला आणि तिच्या प्रियकराच्या पत्नीला दोघांच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाची कुणकुण लागली. 2021 मध्ये महिलेच्या घरात शारीरिक संबंध ठेवत असताना तिच्या पतीने दोघांनाही रंगेहाथ पकडले. या प्रकारानंतर महिलेला तिच्या पतीने घरातून हाकलून दिले.
त्यामुळे आता तु माझ्यासोबत लग्न कर, असा तगादा महिलेने प्रियकराकडे लावला. पण प्रियकराने आपण आधीच विवाहित असून लग्न करू शकत नाही, असं म्हणत नकार दिला. दरम्यान, महिलेने तिच्या प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. लग्नाचे वचन देऊन प्रियकराने जबरदस्तीने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप महिलेने केला.
यानंतर पोलिसांनी महिलेच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला. याविरोधात प्रियकराने थेट कोर्टात धाव घेतली. आम्ही दोघेही विवाहित असून सहमतीने शारीरिक संबंध ठेवले होते, अशी याचिका महिलेच्या प्रियकराने कोर्टात दाखल केली. या याचिकेवर कोर्टाने सुनावणी घेताना दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला.
विवाहित असून देखील महिलेने परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवले. प्रियकर देखील विवाहित आहे, याची माहिती महिलेला होती. त्यामुळे या कृतीला बलात्कार म्हणता येणार नाही. असं निरीक्षण नोंदवत कोर्टाने महिलेच्या प्रियकरावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याचे आदेश दिले.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.