
जालना लाठीमार प्रकरणावर मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या ७ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. यामुळे महायुती सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. (Latest Marathi News)
शिंदे सरकारकडून मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता अपर मुख्य सचिवांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीला कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा आणि या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
आज मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथगृह येथे झाली. दरम्यान, मराठवाड्यातील महसूल आणि शैक्षणिक रेकॉर्ड तपासण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
तत्पूर्वी, या समितीने मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात कुणबी समाजाची माहिती संकलित झाली आहे. हैद्राबाद येथील निझामाचे जुने रेकॉर्ड तातडीने तपासण्यात येणार आहेत, अशी माहिती महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी दिली. यातबरोबर आरक्षणासाठी कुणबी नोंद असलेल्यांची वंशावळी तपासण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही युवकांना नोकऱ्या, शिक्षण, शिष्यवृत्ती तसेच उद्योग व्यवसायांसाठी कर्ज , आर्थिक सहाय या माध्यमातून मदत केली आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. राजकीय स्वार्थासाठी समाजाला भडकावू नये , असेही मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती, सुविधा दिल्या जातात, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 'सारथी संस्थेमार्फत उच्च शिक्षणासाठी फेलोशीप, स्कॉलरशीप, एमपीएससी व युपीएससी व इतर स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रम शासनातर्फे राबविले जातात. आतापर्यंत सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण देण्यात आले,अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.