प्रमोद जगताप, साम टीव्ही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड लवकरच एकाच मंचावर येणार आहेत. मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उच्च न्यायालयाची नवीन इमारत उभी राहणार आहे. येत्या २३ सप्टेंबर रोजी या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश चंद्रचूड हजेरी लावणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत.
विशेष बाब म्हणजे, इमारतीच्या भूमिपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी २४ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे देखील सर्वांच्या नजरा लागून आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. यानंतर दोन्ही पक्षांच्या गटांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केल्या.
यातील काही याचिकांची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर दोन्ही पक्षाच्या सुनावणी होणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सरन्यायाधीश चंद्रचडू एकाच मंचावर येणार असल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.
विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाची आरती केली होती. त्यामुळे संपूर्ण देशात एकच गदारोळ उडाला होता. विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजप आणि पंतप्रधानांवर जोरदार टीका केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या भेटीवरून सरन्यायाधीशांना कोपरखळी मारली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीशांच्या या भेटीवरून मी निंदा करणार नाही. उलट मी सरन्यायाधीशांचे आभार मानेन. कारण, त्यांनी आपल्या घरी मोदी येणार आहेत म्हणून गणरायाला पुढची तारीख दिली नाही, अशी उपरोधिक टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीआधी सरन्यायाधीश चंद्रचूड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर येणार असल्याने मोठं वादळ उठण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.