राज्यात काही दिवसातच गणरायाचे आगमन होणार असून नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी मोफत अन्नदान कक्षाचे उद्धाटन, शारदा गजानन पुरस्कार व जिल्हा स्तरीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा बक्षिस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक गणेश घुले, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे, गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळातर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार आणि शेतकरी बांधवांसाठी मोफत भोजनाचा उपक्रम चांगला आहे. शेतकरी कष्टकरी आहे, लाखाचा पोशिंदा आहे. शेतमालातील चढउतार लक्षात घेऊन बाजारभाव शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना परवडण्याच्यादृष्टीने शासनाकडून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो. (Latest Marathi News)
राज्यातील काही भागात सध्या अवर्षणाची परिस्थिती आहे. गेल्या चार-पाच दिवसात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी तो पुरेसा नाही. शेतकऱ्यांसमोर बिकट संकट उभे राहिले असून पिकांचे नुकसान होत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांपुढील संकटावर मात करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडीअडचणी, शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील तर त्या सोडविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. पणन मंत्री, संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. स्वच्छतेबाबत मार्केट यार्ड आणि पुणे महानगरपालिकेने समन्वय ठेवावा. पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वच बाबतीत पुढे राहील, तिचा नावलौकीक वाढेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.