
मध्य रेल्वेने दिवाळीनिमित्त ३० विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे.
या ट्रेन एलटीटी-मडगाव आणि पनवेल-चिपळूण दरम्यान धावतील.
प्रवाशांना गर्दीमुक्त आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ घेता येईल.
या गाड्यांचे वेळापत्रक देखील समोर आले आहे.
दिवाळी सण साजरा करण्यासाठी मुंबईमध्ये कामानिमित्त राहणारे अनेक जण आपल्या गावी जातात. दिवाळीमध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते त्यामुळे ट्रेनला प्रचंड गर्दी होत असते. सणासुदीच्या काळातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीमध्ये मध्य रेल्वे मार्गावर ३० अतिरिक्त आणि विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा दिवाळीमध्ये प्रवाशांचा प्रवास सुसाट, आरामदायी आणि गर्दीमुक्त होईल.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांचा प्रवास गर्दीमुक्त व्हावा यासाठी मध्य रेल्वेने ३० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मडगाव आणि पनवेल ते चिपळूण दरम्यान धावणार आहेत. त्यामुळे दिवाळीमध्ये कोकण प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव मार्गावर साप्ताहिक ६ विशेष फेऱ्या असतील. ट्रेन क्रमांक ०११४५ एलटीटी -मडगाव विशेष ट्रेन दर सोमवारी ६, १३ आणि २० ऑक्टोबर रोजी एलटीटीवरून सकाळी ८.२० वाजता सुटेल आणि रात्री १०.४० वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचेल. परतीसाठी ट्रेन क्रमांक ०१००४ विशेष ट्रेन रविवारी ५, १२ आणि १९ ऑक्टोबर रोजी मडगावहून दुपारी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता एलटीटी स्थानकावर पोहचेल. या सर्व ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेर्डी, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, वीलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थीवी आणि करमळी या सर्व स्थानकांवर थांबतील.
त्याचसोबत, ट्रेन क्रमांक ०११६० अनारक्षित ट्रेन ३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवार सकाळी ११.०५ वाजता चिपळूणहून सुटेल. ही ट्रेन दुपारी ४.१० वाजता पनवेल रेल्वे स्थानकावर पोहचेल. परतीसाठी ट्रेन क्रमांक ०११५९ अनारक्षित ट्रेन पनवेलहून दुपारी ४.४० वाजता सुटून रात्री ९.५५ वाजता चिपळूण रेल्वे स्थानकावर पोहचेल. या ट्रेन सोमाटणे, आपटा, जीते, पेण, कसु, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कलांबणी बु.दु., खेर्डी आणि अंजनी या रेल्वे स्थानकांवर थांबतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.