BMC Mayor: ठाकरेंचा महापौर होणार? दिग्गज नेत्याची एक 'रिक्वेस्ट' अन् राजकीय वर्तुळात खळबळ
Summary -
मुंबई महापौरपदासाठी भाजप-शिंदेसेनेत तणाव
शिंदे गटाने अडीच वर्षांचा महापौरपदाचा दावा
भास्कर जाधव यांचे शिंदेंना थेट आवाहन
दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना वेग
मुंबई महानगर पालिकेच्या महापौरपदाच्या निवडीवरून भाजप- शिंदेसेनेत रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाने अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी केली आहे. आता मुंबईचा महापौर नेमका कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत मोठं विधान केले आहे. मुंबईच्या महापौर निवडीसाठी शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना मुंबईच्या महापौरपदाबाबत मोठं विधान केले. त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांना विनंती केली. ते म्हणाले की, 'जे कुणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो असे सांगतात. जे कुणी बाळासाहेबांचे आम्ही खरे वारसदार आहे असे सांगतात. त्या सर्वांना मी आवाहन वजा विनंती करतो की हे बाळासाहेबांचं जन्म शताब्दी वर्ष आहे. तुमची बाळासाहेबांवरती खरी श्रद्धा आहे का? बाळासाहेबांवर विश्वास होता का? बाळासाहेबांसमोर नतमस्तक होऊ इच्छिता का? तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपदासाठी पाठिंबा दिला पाहिजे. बाळासाहेबांना मानत असतील तर ते पाठिंबा देतील. एकनाथ शिंदेंनी भाजपला पाठिंबा देता कामा नये.'
मंत्री गुलाबराव पाटील यांनी भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'आता दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. प्रत्येकाचे विचार आहेत.राजकारणात काहीही होऊ शकते. कोण कधी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही. आता आपण बघतो आहे MIM ची कुणासोबत युती आहे. त्यामुळे कोणी कोणासोबत जाऊ शकते कन्फर्म सांगू शकत नाही. शिवसेना एकत्र होतील का? तर राजकारणात काहीही होऊ शकते.'
