

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर
महिला खुल्या प्रवर्गाला महापौरपद मिळालं
राज्यातील २९ महापालिकांची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली
मंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष
राज्यातील २९ महानगर पालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया आज पार पडली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. मुंबई महानगर पालिकेचं महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेवक मुंबई महानगर पालिकेचा महापौर होणार आहे. महापौरपदाच्या शर्यतीमध्ये भाजपच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांचे नाव चर्चेत आहे.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, शिवसेना ठाकरे गटाकडून माजी महापौर किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आनंद परांजपे आणि आमदार मनोज जामसुतकर हे उपस्थित होते.
आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणावरून गोंधळ झाला. ठाकरेसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर या आक्रमक झाल्या. त्यांनी मुंबईच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतला. 'मुंबईचं महापौर आरक्षण रोटेशननुसार का नाही घेतलं?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पण काही वेळाच्या गोंधळानंतर पुन्हा आरक्षण सोडतीला सुरूवात झाली होती.
दरम्यान, मुंबईच्या महापौरपदावरूवन भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. अडीच वर्षांचे महापौरपद शिवसेना शिंदे गटाने मागितले आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपने घवघवीत यश मिळाले. सर्वात जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आल्यामुळे मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार अशी चर्चा सुरू आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या २२७ प्रभागांसाठी निवडणूक झाली होती. भाजपचे ८९ नगरसेवक विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाचे २९ नगरसेवक, ठाकरेसेनेचे ६५ नगरसेवक, काँग्रेसचे २४ नगरसेवक, एमआयएमचे ८, मनसेचे ६ नगरसेवक विजयी झाले आहेत. आता आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे. त्यामुळे महापौर कोणत्या पक्षाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.